स्तोत्र 53
संगीत दिग्दर्शकासाठी. माहलथवर आधारित, दावीदाचे मासकील.
1 मूर्ख आपल्या मनात म्हणतो,
“परमेश्वर अस्तित्वात नाही.”
ते बहकलेले आहेत आणि त्यांची कृत्ये दुष्टच समजावी,
कारण सत्कर्म करणारा कोणी नाही.
2 मानवांमध्ये कोणी समंजस आहे का
परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का
हे पाहण्यासाठी परमेश्वर स्वर्गातून
खाली पाहतात.
3 प्रत्येकजण भटकून गेलेला आहेत;
प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे;
सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.
4 दुष्कृत्य करणार्यांना हे ठाऊक नाही काय?
भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून टाकतील.
ते कधीही परमेश्वराला हाक मारत नाहीत.
5 पण पाहा, जिथे भिण्याचे कारण नव्हते, तिथे ते भयाने भरले.
परमेश्वराने त्यांची हाडे विखरून टाकली,
ज्यांनी तुमच्याविरुद्ध तळ दिला होता;
तुम्ही त्यांची फजिती केली, कारण ते परमेश्वराद्वारे लज्जित झाले आहेत.
6 अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल!
जेव्हा परमेश्वर त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील,
तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!