स्तोत्र 54
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दावीदाचे मासकील. जेव्हा जिफी लोकांनी जाऊन शौलाला कळविले: “दावीद आमच्याजवळ लपला आहे.”
परमेश्वरा, तुम्ही आपल्या नावाने माझे तारण करा;
आपल्या सामर्थ्याने मला निर्दोष जाहीर करा.
परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका.
माझ्या मुखातील शब्दांकडे कान द्या.
 
कारण परकी माणसे माझ्याविरुद्ध उठली आहेत;
परमेश्वराचा आदर न करणारे निर्दयी लोक—
माझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सेला
 
परंतु परमेश्वर निश्चितच माझे साहाय्यकर्ता आहेत;
परमेश्वरच आहेत, जे मला मदत करतात.
 
माझ्या शत्रूंच्या दुष्ट कृत्त्यांचा मोबदला त्यांना मिळो;
परमेश्वरा, तुम्ही आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश करा.
 
मी स्वेच्छेने माझे यज्ञ तुम्हाला अर्पण करणार;
याहवेह, तुमच्या नावाची महिमा मी गाईन, कारण तुमचे नाव उत्तम आहे.
तुम्ही मला माझ्या सर्व संकटातून सोडविले आहे,
आणि माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पहिला आहे.