स्तोत्र 59
संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीदाला ठार करण्याच्या उद्देशाने शौलाने त्याचा घरावर पाळत ठेवण्यासाठी सैनिक पाठवले तेव्हा ही घटना घडली. 
  1 हे परमेश्वरा, मला माझ्या शत्रूपासून सोडवा;  
जे माझ्याविरुद्ध उठले आहेत, त्यांच्यापासून रक्षण करण्यास माझे दुर्ग व्हा.   
 2 दुष्कर्म करणार्यांपासून  
आणि या रक्तपिपासू लोकांपासून माझा बचाव करा.   
 3 पाहा, माझा जीव घेण्यासाठी ते कसा दबा धरून बसले आहेत!  
याहवेह, मी कोणताही अपराध किंवा पाप केले नसता  
क्रूर माणसे माझ्याविरुद्ध कट रचत आहेत.   
 4 मी काही चुकीचे केले नसले तरी ते माझ्यावर आक्रमण करण्याची तयारी करीत आहेत.  
हे परमेश्वरा, उठा, माझ्या कष्टांकडे पाहा आणि मला साहाय्य करा.   
 5 याहवेह, सेनाधीश परमेश्वरा,  
इस्राएलाच्या परमेश्वरा, जागृत होऊन सर्व राष्ट्रांना दंड करा.  
या दुष्ट, विश्वासघातकी लोकांना  
दयामाया दाखवू नका. 
सेला
    6 संध्याकाळी ते परत येतात;  
कुत्र्यांसारखे गुरगुरत  
हल्ला करण्यास ते नगराभोवती हिंडतात.   
 7 ते त्यांच्या तोंडातून काय ओकतात ते पाहा.  
त्यांच्या तोंडातील शब्द तलवारीसारखे धारदार आहेत  
आणि ते विचारतात, “आम्हाला कोण ऐकू शकेल?”   
 8 याहवेह, तुम्ही त्यांच्यावर हसता;  
तुम्ही सर्व राष्ट्रांचा उपहास करता.   
 9 तुम्ही माझे सामर्थ्य आहात, मी तुमची प्रतीक्षा करेन;  
कारण परमेश्वर तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात.   
 10 तुम्ही माझे प्रेमळ परमेश्वर आहात.  
परमेश्वर माझ्यापुढे जातील,  
मग मी माझ्या निंदकांवर समाधानतेने उपहासात्मक दृष्टी टाकू शकेन.   
 11 परंतु त्यांना जिवे मारू नका,  
माझे लोक लवकर विसरतील,  
प्रभू, तुम्ही आमची ढाल*किंवा सार्वभौम आहात.  
आपल्या बलाने त्यांना मुळासकट उपटा आणि त्यांना खाली पाडा.   
 12 त्यांच्या मुखाने केलेली पापे,  
त्यांच्या ओठांचे शब्द  
आणि त्यांनी दिलेल्या शापांमुळे  
व लबाड्यांमुळे त्यांना स्वतःच्या अहंकारात अडकू द्या.   
 13 त्यांना आपल्या क्रोधाच्या अग्नीने भस्म करा,  
त्यांना असे भस्म करा, की त्यांच्यातील काहीही शिल्लक राहणार नाही.  
तेव्हा दिगंतापर्यंत कळेल की  
परमेश्वर खरोखरच याकोबाचे सत्ताधारी आहेत. 
सेला
    14 संध्याकाळी ते परत येतात;  
कुत्र्यांसारखे गुरगुरत,  
हल्ला करण्यास ते नगराभोवती हिंडतात.   
 15 अन्नाचा शोध करीत भटकतात  
आणि संतुष्ट झाले नाही तर भुंकत राहतात.   
 16 परंतु मी दररोज सकाळी तुमचे सामर्थ्य  
आणि तुमची दया यांची गीते गाईन,  
कारण माझ्या दुःखाच्या व संकटाच्या दिवसात तुम्ही माझे  
आश्रयदुर्ग आणि शरणस्थान आहात.   
 17 हे माझ्या सामर्थ्या, तुमची स्तुतिस्तोत्रे मी गात आहे,  
कारण हे माझ्या दयाळू परमेश्वरा,  
तुम्हीच माझ्या सुरक्षिततेचे उंच दुर्ग आहात.