स्तोत्र 60
संगीत दिग्दर्शकासाठी. “शूशन एदूथ” कराराची कुमुदिनीच्या चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. हे शिकविण्यासाठी लिहिले गेले आहे. दावीद अराम-नहराईम आणि अराम-झोबाह देशांशी युद्ध करीत असतानाच्या परिस्थितीचा हा उल्लेख आहे. त्याचवेळी सेनापती योआब, क्षार खोर्यात परतला, त्याने बारा हजार एदोमाच्या सैनिकांचा नाश केला.
1 हे परमेश्वरा, तुम्ही आमचा त्याग केला, आम्हाला फोडून टाकले आहे;
तुम्ही आमच्यावर कोपला आहात—आता आम्हाला पूर्वस्थितीवर आणा!
2 तुम्ही भूमी कंपित केली आहे आणि तुम्ही तिला दुभंगले आहे;
आता तुम्हीच तिला नीटनेटके करा, कारण ती सर्वस्वी हादरली आहे.
3 तुम्ही आमच्याबाबत अतिशय कठोर झाले आहात;
तुम्ही आम्हाला झोकांड्या खावयास द्राक्षारस दिला आहे.
4 परंतु तुम्ही आपल्या भय बाळगणार्यांकरिता एक झेंडा उंचाविला आहे
की तो आमच्या शत्रुंविरुद्ध प्रदर्शित करू.
सेला
5 आम्हाला वाचवा आणि तुमच्या उजव्या हाताने मदत करा
म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर प्रीती करता त्यांचे तारण होईल.
6 परमेश्वराने त्यांच्या पवित्रस्थानी घोषणा केली:
“मी विजयाने शेखेमचे विभाजन करेन,
आणि सुक्कोथाचे खोरे मोजून त्याचे इतरांना वाटप करेन.
7 गिलआद माझा आहे. मनश्शेह माझा आहे.
एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे.
यहूदाह माझा राजदंड आहे.
8 मोआब माझे हात धुण्याचे गंगाळ आहे,
आणि एदोमावर मी माझी पादत्राणे फेकेन;
पलेशेथावर मी विजयाचा जयघोष करेन.”
9 मला तटबंदीच्या नगरात कोण आणेल?
मला एदोम प्रांतात कोण नेईल?
10 परमेश्वरा, तुम्हीच आम्हाला नाकारले आहे ना,
आणि आता तुम्ही आमच्या सैन्याबरोबरही जात नाही?
11 शत्रूविरुद्ध तुम्ही आमचा पुरवठा करा,
कारण मानवाचे साहाय्य व्यर्थ आहे.
12 परमेश्वराच्या साहाय्याने आमचा विजय सुनिश्चित आहे,
आणि तेच आमच्या शत्रूंना पायदळी तुडवतील.