स्तोत्र 68
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाची रचना. एक स्तोत्र. एक गीत. 
  1 परमेश्वराने उठावे आणि त्यांच्या सर्व शत्रूंची दाणादाण होवो;  
त्यांचे वैरी त्याच्यापुढून पळून जावोत.   
 2 तुम्ही त्यांना धुरासारखे उडवून लावो—  
जसे अग्नी समक्ष मेण वितळते,  
तसे परमेश्वराच्या समक्षतेपुढून दुष्ट लोक नष्ट होवोत.   
 3 परंतु नीतिमान मनुष्य हर्ष करो;  
परमेश्वरापुढे आनंद करो;  
हर्षामुळे उल्लास करो.   
 4 परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या नावाचे स्तवन करा,  
जे मेघांवर स्वार होतात, त्यांची महिमा करा;  
त्यांचे नाव याहवेह आहे—त्यांच्या समक्षतेत हर्ष करा.   
 5 परमेश्वर पितृहीनांचे पिता आणि विधवांचे न्यायदाता आहेत,  
ते आपल्या पवित्र निवासस्थानी आहेत.   
 6 एकाकी लोकांना ते कुटुंबात वसवितात,  
कैद्यांना ते तुरुंगातून मुक्त करतात, तेव्हा ते आनंदाने गाऊ लागतात;  
परंतु बंडखोरांच्या वाट्याला दुष्काळ आणि दुःखच येणार.   
 7 हे परमेश्वरा, जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांच्या पुढे चाललात,  
जेव्हा तुम्ही रानातून चाललात, 
सेला
    8 तेव्हा पृथ्वी थरथर कापली,  
परमेश्वरासमोर आकाशातून वृष्टी झाली,  
परमेश्वरासमोर, इस्राएलाच्या परमेश्वरासमोर सीनाय पर्वत कंपित झाला.   
 9 परमेश्वरा, तुम्ही मुबलक पाऊस दिला.  
तुम्ही तुमचा थकलेला वारसा ताजातवाना करता.   
 10 तुमची प्रजा तिथे राहिली,  
परमेश्वरा, तुमच्या भांडारातून तुम्ही दयाळूपणाने गरिबांना मदत केली.   
 11 प्रभूने आज्ञा दिली आणि मोठ्या संख्येने  
महिलांनी मोठ्या आनंदाने या वार्तेचा प्रसार केला:   
 12 “राजे आणि सेनांनी पळ काढला आहे;  
घरी राहिलेल्या स्त्रिया लूट वाटून घेत आहेत.   
 13 जेव्हा तुम्ही मेंढवाड्यात पडून राहता,  
तेव्हा असे दिसते की जणू कबुतराच्या पंखांना चांदी असते  
आणि त्यांचे पाय चमकणार्या सोन्याने मढविलेले असतात.”   
 14 सर्वसमर्थाने*किंवा शद्दाय, सलमोन पर्वतावर वितळून जाणार्या  
हिमकणांसारखी राजांची पांगापांग केली.   
 15 बाशान पर्वता, वैभवी बाशान पर्वता,  
अनेक शिखरांच्या रांगा असलेल्या पर्वता, बाशान पर्वता,   
 16 आपल्या सर्वकाळच्या निवासासाठी परमेश्वराने ज्याची निवड केली,  
त्या सीयोन पर्वताकडे तू हेव्याने का पाहतोस?  
याहवेहनी ते निवास करण्यासाठी निवडले.   
 17 परमेश्वराचे रथ दहा दहा हजार  
आणि हजारो हजार आहेत;  
प्रभू सीनाय पर्वतावरून पवित्रस्थानी आले आहेत.   
 18 जेव्हा तुम्ही उच्चस्थानी आरोहण करता,  
तुम्ही अनेक बंदिवान नेले;  
मनुष्यासाठी तुम्ही नजराणे स्वीकारता;  
अगदी एकेकाळच्या बंडखोरांपासून सुद्धा—  
जेणेकरून येथे याहवेह परमेश्वर आमच्यामध्ये वस्ती करतील.   
 19 परमेश्वर, आमचे प्रभू, आमच्या तारकाचे स्तवन होवो,  
ते दररोज आमची ओझी वाहतात. 
सेला
    20 आमचे परमेश्वरच, असे परमेश्वर आहेत जे आम्हाला तारण देतात;  
आम्हाला मृत्यूपासून वाचविणारे सार्वभौम याहवेहच आहेत.   
 21 परमेश्वर खात्रीने आपल्या शत्रूंची  
आणि पापमार्गाला चिकटून राहणार्या लोकांची डोकी फोडतील.   
 22 प्रभूने घोषणा केली, “बाशान येथून मी तुझे शत्रू पुन्हा आणेन;  
समुद्राच्या तळातून मी त्यांना पुन्हा वर आणेन,   
 23 म्हणजे तुम्ही त्यांच्या रक्ताच्या पाटातून चालाल  
आणि तुमच्या कुत्र्यांना ते रक्त मनसोक्त चाटता येईल.”   
 24 हे परमेश्वरा, तुमची मिरवणूक आता दिसू लागली आहे;  
पवित्रस्थानाकडे माझ्या परमेश्वराची, माझ्या राजाची, मिरवणूक चालली आहे.   
 25 गाणारे पुढे, वाद्ये वाजविणारे मागे  
आणि त्या दोहोंच्यामध्ये कुमारिका खंजिर्या वाजवित चालल्या आहेत.   
 26 महासभेत परमेश्वराची स्तुती करोत;  
इस्राएलाच्या सभेत याहवेहची स्तुती करोत.   
 27 बिन्यामीनचा छोटा वंश नेतृत्व करीत पुढे चालला आहे,  
यहूदाह वंशाचे अधिपती  
आणि जबुलून व नफताली वंशाचे अधिपती त्यामध्ये आहेत.   
 28 हे परमेश्वरा, तुमचे बळ एकवटून;  
तुम्ही आमच्यासाठी पूर्वी केले, तसे तुमचे सामर्थ्य प्रगट करा.   
 29 पृथ्वीवरील राजे यरुशलेमातील तुमच्या मंदिराच्या  
गौरवामुळे तुम्हाला भेटी घेऊन येत आहेत.   
 30 हे परमेश्वरा, लव्हाळ्यात राहणार्या वनपशूंना, बैलांचा कळप  
आणि त्यांच्यासोबत त्यांच्या वासरांना धमकावा;  
खंडणीची तीव्र इच्छा बाळगणार्यांना पायाखाली तुडवा,  
आणि युद्धात आनंद मानणार्या राष्ट्रांची दाणादाण करा.   
 31 इजिप्त देशातून राजदूत येतील;  
कूश परमेश्वरापुढे नम्र होईल.   
 32 पृथ्वीवरील राष्ट्रांनो, परमेश्वराचे गुणगान गा,  
प्रभूचे स्तवन करा, 
सेला
    33 अनादि काळापासून अत्युच्च आकाशात स्वारी करतात,  
ज्यांचा प्रचंड आवाज ढगांच्या गर्जनांसारखा आहे.   
 34 परमेश्वराच्या सामर्थ्याची घोषणा करा;  
त्यांचे ऐश्वर्य इस्राएलवर प्रकाशित आहे;  
त्यांचे महान सामर्थ्य आकाशात आहे.   
 35 परमेश्वरा, तुम्ही आपल्या पवित्रस्थानात भयावह आहात;  
इस्राएलचे परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य आणि बळ देतात.  
परमेश्वर धन्यवादित असो!