स्तोत्र 69
संगीत दिग्दर्शकासाठी. “कुमुदिनी” चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र. 
  1 परमेश्वरा, मला वाचवा;  
कारण पाणी गळ्यापर्यंत पोहोचले आहे.   
 2 दलदलीत मी खोल रुतत चाललो आहे;  
मला माझ्या पायावर उभे राहता येत नाही.  
मी खोल दलदलीत आलो आहे;  
माझ्या सभोवती पाणी वाढत चालले आहे.   
 3 अगदी थकून जाईपर्यंत मी मदतीसाठी आक्रोश केला आहे;  
माझा घसा कोरडा झाला आहे.  
आपल्या परमेश्वराची वाट पाहत,  
माझे डोळे थकले आहेत.   
 4 माझा विनाकारण द्वेष करणार्यांची संख्या  
माझ्या डोक्यावरील केसांपेक्षा अधिक आहेत;  
पुष्कळ लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत.  
मला नष्ट करण्याची त्यांची इच्छा आहे.  
मी जे चोरले नाही,  
त्याची भरपाई करण्याची माझ्यावर बळजबरी होत आहे.   
 5 हे परमेश्वरा, माझा मूर्खपणा तुम्हाला माहीत आहे;  
माझे दोष तुमच्यापासून लपलेले नाहीत.   
 6 हे प्रभू, सर्वशक्तिमान याहवेह,  
जे तुमच्यावर आशा ठेवतात,  
माझ्यामुळे ते लज्जित होऊ नये;  
इस्राएलाच्या परमेश्वरा,  
जे तुमचा शोध घेतात त्यांची  
माझ्यामुळे अप्रतिष्ठा होऊ देऊ नका.   
 7 तुमच्याकरिता माझी विटंबना झाली आहे,  
माझे मुख लज्जेने व्याप्त झाले आहे.   
 8 माझ्या कुटुंबासाठी मी परका आहे,  
माझी सख्खी भावंडेही मला ओळखत नाही.   
 9 तुमच्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे,  
आणि त्यांनी केलेला तुमचा अपमान माझ्यावर पडला आहे.   
 10 जेव्हा मी शोक करून उपास केला,  
तेच माझ्यासाठी निंदेचे कारण ठरले;   
 11 जेव्हा मी गोणपाट पांघरले,  
तेव्हा ते माझ्याबद्दल उपहासाने बोलू लागले.   
 12 मी गावातील लोकांच्या कुत्सित चर्चेचा विषय झालो आहे  
आणि मी मद्यप्यांच्या गीतांचा विषय झालो आहे.   
 13 तरी याहवेह, तुमच्या प्रसन्नतेच्या वेळेसाठी  
मी तुमच्याकडे प्रार्थना करीत आहे;  
हे परमेश्वरा तुमच्या महान प्रीती निमित्त  
तुमच्या विश्वसनीय तारणाद्वारे मला उत्तर द्या.   
 14 मला या दलदलीतून बाहेर काढा;  
मला त्यामध्ये बुडू देऊ नका;  
माझा द्वेष करणार्यापासून मला वाचवा.  
खोल पाण्यातून मला बाहेर काढा.   
 15 महापुरांच्या लोंढ्यात मला बुडू देऊ नका  
किंवा डोहाला मला गिळू देऊ नका;  
गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नका.   
 16 याहवेह, तुमच्या प्रीतिपूर्ण दयेने माझ्या प्रार्थनेची उत्तरे द्या;  
तुम्ही विपुल कृपेने आपले मुख माझ्याकडे करा.   
 17 तुम्ही आपल्या सेवकापासून आपले मुख लपवू नका;  
त्वरेने मला उत्तर द्या, कारण मी संकटात सापडलो आहे.   
 18 माझ्याजवळ या आणि माझा बचाव करा;  
माझ्या शत्रूपासून मला सोडवा.   
 19 ते माझी कशी निंदा करतात, विटंबना आणि अप्रतिष्ठा करतात हे तुम्ही जाणता;  
माझे सर्व शत्रू तुमच्यापुढे आहेत.   
 20 त्यांच्याकडून होणार्या तिरस्काराने माझे हृदय भग्न झाले आहे;  
मी अत्यंत हतबल झालो आहे;  
मी सहानुभूतीची अपेक्षा केली, पण ती मला मिळाली नाही;  
मी सांत्वना देणार्यांचा शोध घेतला पण मला कोणीही आढळले नाही.   
 21 अन्न म्हणून त्यांनी मला विष दिले,  
तहान भागविण्यासाठी त्यांनी मला आंब दिला.   
 22 त्यांच्यासाठी तयार केलेला मेज सापळा असा होवो;  
ते स्वस्थ असता त्यांच्यासाठी ते सूड व पाश ठरतील.   
 23 त्यांचे डोळे अंधकारमय होवोत म्हणजे त्यांना दिसणार नाही,  
आणि त्यांची कंबर कायमची खाली वाकवून ठेवा.   
 24 तुमचा सर्व क्रोध त्यांच्यावर ओता;  
तुमचा संतापाचा भयानक अग्नी त्यांच्यावर येऊ द्या.   
 25 त्यांचे ठिकाण ओसाड पडो;  
त्यांच्या तंबूत कोणीही वस्ती न करो.   
 26 कारण ज्याला तुम्ही शासन केले, त्याचाच ते छळ करतात,  
आणि ज्याला तुम्ही घायाळ केले, त्यांच्या वेदनेबद्दल ते बोलतात.   
 27 त्यांच्या दुष्कृत्यांच्या प्रमाणात तुम्ही त्यांना शासन करा  
आणि तुमच्या तारणाचा वाटा त्यांना देऊ नका.   
 28 जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत;  
नीतिमानांच्या यादीत त्यांची नावे येऊ नयेत.   
 29 मी दुःखित आणि पीडित आहे—  
परमेश्वर तुमचे तारणच माझी सुरक्षा आहे.   
 30 मी परमेश्वराची स्तुती गीत गाऊन करेन  
आणि उपकारस्तुती करून त्यांचे गौरव करेन.   
 31 यामुळे याहवेहला, बैलाच्या किंवा शिंगे आणि खुरे असलेल्या  
गोर्ह्याच्या यज्ञार्पणापेक्षा, अधिक आनंद होईल.   
 32 दीनजन हे पाहतील आणि ते हर्षभरित होतील—  
तुम्ही जे परमेश्वराचा शोध करतात, त्यांच्या हृदयात नवजीवन येवो.   
 33 याहवेह गरजूंचे ऐकतात  
आणि ते आपल्या बंदिवानांचा अव्हेर करीत नाही.   
 34 हे आकाशा, अगे पृथ्वी,  
हे समुद्रा, अहो समुद्रात संचार करणाऱ्या सर्व प्राण्यांनो, त्यांचे स्तवन करा,   
 35 कारण परमेश्वर सीयोनचे रक्षण करतील  
यहूदाह प्रांतातील शहरे ते पुन्हा स्थापित करतील.  
त्यांचे लोक तिथे वस्ती करतील आणि तेथील अधिकार घेतील;   
 36 त्यांच्या सेवकांच्या मुलांनाही हा देश वतन म्हणून मिळेल,  
त्यांच्या नावावर प्रीती करणारे सर्वजण तिथे वसती करतील.