स्तोत्र 70
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाची रचना. एक याचिका. 
  1 हे परमेश्वरा, त्वरा करून मला वाचवा;  
याहवेह, मला साहाय्य करण्यासाठी त्वरेने या.   
 2 माझा जीव घेऊ पाहणार्यांना  
लज्जित करा व गोंधळात पाडा;  
जे सर्वजण माझे विघ्नसंतोषी आहेत  
ते अप्रतिष्ठित होऊन माघारी फिरोत.   
 3 जे लोक मला, “अहाहा! अहाहा!” म्हणतात,  
ते लज्जित होऊन माघारी फिरोत.   
 4 परंतु जे सर्व तुमचा शोध घेतात  
ते तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत;  
जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात  
ते सर्व नेहमी हेच म्हणोत, “परमेश्वर किती महान आहेत!”   
 5 परंतु मी तर गरीब आणि गरजवंत आहे;  
हे परमेश्वरा, माझ्याकडे त्वरेने या.  
तुम्ही माझे साहाय्यकर्ता आणि मला सोडविणारे आहात;  
याहवेह, विलंब करू नका.