स्तोत्र 71
 1 याहवेह, मी केवळ तुमच्या ठायी आश्रय घेतला आहे;  
मला लज्जित होऊ देऊ नका.   
 2 तुमच्या नीतिमत्वानुसार मला वाचवा आणि सोडवा;  
तुम्ही आपले कान माझ्याकडे लावा आणि माझे तारण करा.   
 3 मी सदैव जाऊ शकेन असे  
माझे आश्रयाचे खडक तुम्ही व्हा;  
तुम्ही माझ्या तारणाची आज्ञा द्या,  
कारण तुम्हीच माझे खडक व माझे दुर्ग आहात.   
 4 परमेश्वरा, मला दुष्ट लोकांच्या पंजातून सोडवा,  
अन्यायी आणि क्रूर लोकांच्या तावडीतून मला मुक्त करा.   
 5 प्रभू याहवेह, केवळ तुम्हीच माझे आशास्थान आहात;  
तारुण्यापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे.   
 6 जन्मापासूनच मी तुमच्यावर अवलंबून आहे;  
तुम्ही मला माझ्या आईच्या गर्भातून बाहेर आणले.  
मी सर्वकाळ तुमची स्तुती करेन.   
 7 अनेक लोकांसाठी मी एक उदाहरण झालो आहे;  
तुम्ही माझे प्रबळ शरणस्थान आहात.   
 8 माझे मुख तुमच्या स्तुतीने भरलेले असते,  
दिवसभर तुमच्या वैभवाची घोषणा करतो.   
 9 माझ्या वृद्धावस्थेत माझा त्याग करू नका;  
माझी शक्ती म्लान होत असता मला सोडू नका.   
 10 माझे शत्रू माझ्याविरुद्ध बोलतात;  
माझा जीव घेणारे एकत्र येऊन मसलत करतात.   
 11 ते म्हणतात, “परमेश्वराने त्याचा त्याग केला आहे;  
त्याचा पाठलाग करून त्याला धरा,  
कारण त्याला कोणीही सोडविणारा नाही.”   
 12 परमेश्वरा, माझ्यापासून दूर राहू नका,  
माझ्या परमेश्वरा, लवकर येऊन माझे साहाय्य करा.   
 13 जे माझ्यावर आरोप लावतात ते लज्जित होऊन नष्ट होवोत;  
जे माझे वाईट करू इच्छितात  
त्यांना अपयश आणि अप्रतिष्ठा यांनी आच्छादून टाका.   
 14 परंतु मी तर निरंतर आशा करीतच राहणार;  
मी तुमची अधिकाधिक स्तुती करेन.   
 15 जरी मला त्यांचे वर्णन करण्याची क्षमता नाही  
तरी दिवसभर माझे मुख तुमच्या न्यायीपणाच्या—  
आणि तारणाच्या कृत्यांबद्दल घोषणा करेल.   
 16 मी येईन आणि प्रभू याहवेहच्या महान कार्याची घोषणा करेन;  
मी तुमच्या, केवळ तुमच्याच, नीतियुक्त कृत्यांची घोषणा करेन.   
 17 परमेश्वरा, तारुण्यापासून तुम्ही मला शिकवीत आलेले आहात,  
आणि आजपर्यंत मी तुमच्या अद्भुतकृत्यांना जाहीर करीत आहे.   
 18 आता माझे केस पांढरे झालेले असताना आणि मी वयस्कर झालो असताना,  
परमेश्वरा, माझा त्याग करू नका;  
तुमच्या सर्व सामर्थ्याचे वर्णन नवीन पिढीला  
आणि त्यांच्या मुलांना देखील सांगण्यासाठी तुम्ही मला अवधी द्या.   
 19 परमेश्वरा, तुमचे नीतिमत्व आकाशापर्यंत अत्यंत उंच आहे;  
तुम्ही केलेली कृत्ये अद्भुत आहेत,  
परमेश्वरा, तुमच्यासारखा दुसरा कोण आहे?   
 20 असाध्य, असंख्य आणि अतितीव्र समस्या  
तुम्ही मला दाखविल्या आहेत,  
तरी तुम्ही मला नवजीवन द्याल,  
आणि पृथ्वीच्या गर्भातून  
तुम्ही मला पुन्हा वर काढाल.   
 21 तुम्ही माझा सन्मान वाढवाल  
आणि माझ्याकडे वळून पुनः माझे सांत्वन कराल.   
 22 माझ्या परमेश्वरा, मी सतारीवर  
तुमच्या विश्वासूपणाबद्दल तुमचे स्तवन करेन;  
हे इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरा,  
मी वीणेवर तुमची स्तुती गाईन.   
 23 हर्षभराने माझे ओठ तुमचा जयजयकार करतील  
आणि तुम्ही माझा उद्धार केला  
म्हणून मी तुमची स्तुतिस्तोत्रे उच्चस्वराने गाईन.   
 24 तुमच्या न्यायीपणाचे वर्णन  
माझी जीभ दिवसभर करेल,  
कारण मला अपाय करण्याची योजना करणारे  
सर्व लज्जित आणि अपमानित झाले आहेत.