स्तोत्र 72
शलोमोनाची गीत रचना
1 हे परमेश्वरा, राजाला न्यायदातृत्व
आणि राजपुत्रास नीतिमत्व प्रदान करा.
2 तो तुमच्या लोकांचा नीतीने न्याय करो,
तुमच्या पीडितांचा न्यायनिवाडा न्यायीपणाने करो.
3 मग पर्वत लोकांना समृद्धी प्रदान करो,
आणि डोंगर नीतिमत्वाची फळे उत्पादित करो.
4 तो लोकांमधील पीडितांचा बचाव करो
आणि गरजूंच्या मुलांना वाचवो;
तो जुलमीला चिरडून टाको.
5 जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात राहतील,
तोपर्यंत पिढ्यान् पिढ्या तुमचे भय बाळगून तुमचा आदर करोत.
6 कापलेल्या गवतावर पडणार्या पावसाप्रमाणे,
पृथ्वीला पाणी देणार्या सरीप्रमाणे तो होवो.
7 त्याच्या कारकिर्दीत सर्व नीतिमानांची भरभराट होवो
आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत समृद्धी वाढो.
8 त्याची सत्ता एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत
आणि नदीपासून*अर्थात् फरात नदी किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत राहो.
9 अरण्यातील लोक त्याच्यासमोर नतमस्तक होवोत
आणि त्याचे शत्रू धूळ चाटोत.
10 तार्शीश आणि तटवर्तीय राजे
आपआपले नजराणे आणोत,
शबा व सबा यांचे सर्व राजे
आपले उपहार आणोत.
11 होय, सर्व ठिकाणचे राजे त्याला नमन करोत;
सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत.
12 ज्यांचा कोणी सहायक नाही अशा
धावा करणार्या दुःखितांना तो मुक्त करेल.
13 दुर्बल आणि दरिद्री यांची त्याला दया येवो;
तो गरजवंताला मृत्यूपासून वाचवेल.
14 तो त्यांना छळ आणि हिंसा यांच्यापासून वाचवेल,
कारण त्यांचे जीवित रक्त मोलाचे आहे.
15 तो चिरायू होवो!
त्याला शबाचे सोने मिळो;
त्याचे लोक सतत त्याच्यासाठी प्रार्थना करोत
आणि दिवसभर त्याला आशीर्वाद देवोत.
16 देशभर विपुल धान्य उगवो;
लबानोनच्या†किंवा डोंगराच्या शिखरावर ते डोलू द्या,
देशातील डोंगरही धान्याने आच्छादून जावोत;
शेतातील भरगच्च गवताप्रमाणे शहरे लोकांनी भरून गजबजून जावोत.
17 त्याचे नाव सर्वकाळ राहो,
जोपर्यंत सूर्य आहे, त्याचे नाव वाढत जावो.
सर्व राष्ट्रे त्याच्याद्वारे आशीर्वादित होवोत,
आणि ते त्याला धन्य म्हणोत.
18 इस्राएलाचे परमेश्वर, याहवेह धन्यवादित असोत,
केवळ तेच महान कार्य करतात.
19 त्यांच्या गौरवशाली नावाचे सदासर्वकाळ स्तवन होवो;
सर्व पृथ्वी त्यांच्या गौरवाने भरो.
आमेन आणि आमेन.
20 इशायाचा पुत्र दावीदच्या प्रार्थना समाप्त झाल्या.
*स्तोत्र 72:8 अर्थात् फरात नदी किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते
†स्तोत्र 72:16 किंवा डोंगराच्या