स्तोत्र 88
एक गीत. कोरहाच्या पुत्रांची स्तोत्र रचना. संगीत निर्देशकाकरिता. माहालाथ लान्नोथ चालीवर आधारित. एज्रावंशी हेमानचा मासकील
1 हे याहवेह, माझ्या तारणकर्त्या परमेश्वरा,
रात्रंदिवस मी तुमच्यापुढे आक्रोश करीत आहे;
2 माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहचो;
माझ्या आरोळीकडे कान द्या.
3 क्लेशांनी मला जेरीस आणले आहे
आणि माझे जीवन मृत्यूच्या जवळ येत आहे.
4 गर्तेत पडणार्यांमध्ये माझी गणना झाली आहे;
जणू काही माझी सर्व शक्ती नष्ट झाली आहे.
5 मृतांमध्ये मला असे टाकण्यात आले आहे,
जसे वधलेल्यास कबरेत ठेवतात,
आणि ज्यांचे तुम्हाला विस्मरण झाले आहे,
ज्यांना तुमच्या आश्रयापासून दूर करण्यात आले आहे.
6 तुम्ही मला अत्यंत खोल दरीत ढकलून दिले आहे,
काळ्याकुट्ट डोहात टाकले आहे.
7 तुमच्या क्रोधाचा भार मला फारच जड झाला आहे;
तुमच्या क्रोधाच्या लाटांनी मला पीडले आहे.
सेला
8 माझ्या जिवलग मित्रांना माझ्यापासून दूर करून,
त्यांना माझा वीट येईल, असे तुम्ही केले आहे.
मी कोंडलेला असून त्यातून बाहेर पडू शकत नाही.
9 वेदनेने माझे डोळे म्लान झाले आहेत.
याहवेह, मी रोज तुमचा धावा करतो;
हात पसरून तुमच्याकडे विनंती करतो.
10 कारण कबरेत गेलेल्यांमध्ये तुम्ही चमत्कार करणार काय?
जे मेलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय.
सेला
11 तुमच्या प्रेमाची घोषणा कबरेत जाहीर होणार काय?
तुमची विश्वसनीयता विनाशात कशी प्रदर्शित होणार?
12 अंधकारमय स्थान तुमची अद्भुत कृत्ये घोषित करेल काय?
अथवा विस्मरणाच्या भूमीत तुमच्या नीतिमत्तेची साक्ष देता येईल काय?
13 परंतु हे याहवेह, मी तुमचा धावा करतो;
माझी प्रार्थना दररोज प्रातःकाळी तुमच्यापुढे सादर होवो.
14 हे याहवेह, तुम्ही माझा त्याग का केला,
आणि आपले मुख माझ्यापासून का फिरविले?
15 तारुण्यापासून मी दुःखी आणि मरणोन्मुख आहे;
तुमच्या भीतीने ग्रस्त होऊन मी असहाय झालो आहे.
16 तुमच्या क्रोधाने मला ग्रासले आहे.
तुमच्या भीतीने माझा विध्वंस झाला आहे.
17 त्याने दिवसभर जलप्रलयाप्रमाणे सर्व बाजूंनी घेरले आहे.
त्याने मला पूर्णपणे गिळंकृत केले आहे.
18 माझे प्रियजन आणि शेजाऱ्यांना तुम्ही माझ्यापासून दूर केले—
अंधारच आता माझा घनिष्ठ मित्र झाला आहे.