स्तोत्र 94
 1 याहवेह, सूड घेणारे परमेश्वर आहेत,  
हे सूड घेणारे याहवेह, प्रज्वलित व्हा.   
 2 पृथ्वीच्या न्यायाधीशा उठा;  
गर्विष्ठांचा यथार्थ सूड घ्या.   
 3 याहवेह, कुठवर दुष्कर्मी,  
हे दुष्ट कुठवर जयोत्सव करणार?   
 4 ते उन्मत्त शब्दांचा वर्षाव करतात;  
सर्व दुष्कर्मी बढाईखोरीने भरलेले आहेत.   
 5 हे याहवेह, ते तुमच्या लोकांना तुडवितात;  
तुमच्या वारसांना ते छळतात.   
 6 ते विधवा, निर्वासितांचा वध करतात;  
आणि अनाथांचा जीव घेतात;   
 7 ते म्हणतात, “याहवेह पाहत नाहीत;  
याकोबाचा परमेश्वर लक्ष देत नाही.”   
 8 विचार करा, या लोकांमधील मूर्खांनो;  
निर्बुद्ध्यांनो, तुम्हाला शहाणपण कधी येणार?   
 9 ज्यांनी कान जडले ते बहिरे आहेत काय?  
ज्यांनी डोळे घडविले त्यांना दृष्टी नाही काय?   
 10 जे राष्ट्रांना शिस्त लावतात, ते शिक्षा करणार नाहीत काय?  
जे मानवाला शिक्षण देतात, त्यांना ज्ञानाची कमतरता असेल काय?   
 11 याहवेह मनुष्याचे सर्व विचार जाणतात;  
ते निरर्थक असतात हे त्यांना ठाऊक आहे.   
 12 याहवेह, धन्य तो पुरुष, ज्याला तुम्ही शिस्त लावता,  
ज्याला तुम्ही तुमचे विधिनियम देण्यासाठी निवडले आहे;   
 13 जोपर्यंत दुष्टासाठी खाच खोदली जात नाही,  
तोपर्यंत तुम्ही त्याला विपत्तीपासून विसावा देता.   
 14 याहवेह आपल्या प्रजेचा त्याग करणार नाहीत;  
त्यांच्या वारसांना ते कधीही टाकणार नाहीत.   
 15 न्यायनिवाडा पुन्हा न्यायीपणानेच होईल,  
आणि नीतिमान हृदयाचे त्याचे पालन करतील.   
 16 माझ्यातर्फे दुष्ट लोकांविरुद्ध कोण उभा राहील?  
कुकर्मी लोकांविरुद्ध माझ्याकडून कोण लढेल?   
 17 याहवेहने मला साहाय्य केले नसते,  
तर मी केव्हाच मरणाच्या निःशब्दतेत निवास केला असता.   
 18 “हे याहवेह, मी घसरत आहे,” असा मी धावा केला,  
तेव्हा त्यांच्या करुणामय प्रीतीने मला सावरले.   
 19 जेव्हा माझे अंतःकरण व्याकूळ झाले,  
तेव्हा तुमच्या सांत्वनाने मला हर्षित केले.   
 20 भ्रष्ट सिंहासन तुमच्याशी संघटित होईल काय—  
जे अन्यायी कायदे लागू करून दुर्दशा करतात?   
 21 दुष्ट नीतिमानाविरुद्ध एकत्र होतात,  
आणि निरपराध्यास मृत्युदंड देतात.   
 22 परंतु याहवेह माझा दुर्ग झाले आहेत,  
आणि तेच माझे परमेश्वर, माझ्या आश्रयाचे खडक.   
 23 तेच त्यांच्या दुष्टतेचा सूड घेतील,  
आणि त्यांच्या दुष्टतेबद्दल त्यांचा नाश करतील;  
याहवेह आमचे परमेश्वर त्यांचा नायनाट करतील.