स्तोत्रसंहिता 95
1 या हो या, आपण याहवेहचा जयजयकार करू या;
आपल्या तारणाच्या खडकासाठी आनंदाने जयघोष करू या.
2 कृतज्ञ अंतःकरणांनी त्यांच्यापुढे येऊ;
आणि वाद्यसंगीतासह स्तुतिस्तोत्रे गाऊन स्तवन करू.
3 कारण याहवेह हे महान परमेश्वर आहेत;
समस्त दैवतांवर ते सर्वोच्च राजा आहेत.
4 पृथ्वीची खोल स्थळे त्यांच्या नियंत्रणात आहेत,
आणि पर्वताची शिखरेही त्यांचीच आहेत.
5 समुद्र त्यांचेच आहेत, कारण ते त्यांनी उत्पन्न केले,
आणि कोरडी भूमीही त्यांचीच हस्तरचना आहे.
6 या हो या, आपण नतमस्तक होऊन आराधना करू या,
आपले उत्पन्नकर्ता याहवेह, यांच्यापुढे गुडघे टेकू;
7 कारण ते आपले परमेश्वर आहेत.
आपण त्यांच्या कुरणातील प्रजा
आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत.
आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकली, तर किती बरे!
8 “मरीबाह*मरीबाह अर्थात् भांडण येथे असताना केली तशी,
जसे मस्सा†मस्सा परीक्षा च्या दिवशी तुम्ही रानामध्ये केले तसे, तुमची अंतःकरणे कठीण करू नका.
9 माझे अनेक चमत्कार पाहिलेले असतानाही,
तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.
10 चाळीस वर्षे त्या पिढीवर मी फार संतापलो;
मी म्हणालो, ‘या लोकांची हृदये भटकलेली आहेत
आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.’
11 मग मी रागाने शपथ घेतली की,
‘ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”