स्तोत्र 101
दावीदाची रचना. एक स्तोत्र.
1 हे याहवेह, तुमची प्रीती आणि न्याय याविषयी मी गीत गाईन;
मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.
2 सुज्ञपणाने जीवन जगणे हे माझे लक्ष्य आहे—
तुम्ही माझ्याकडे कधी येणार?
माझ्या घरातील माझा व्यवहार
मी निष्कलंक तर्हेने करेन.
3 मी कुठल्याच अनुचित वस्तूकडे
नजर टाकणार नाही.
मला विश्वासहीन लोकांच्या व्यवहारांचा तिरस्कार आहे.
त्यांच्यापासून मी अलिप्त राहीन.
4 कुटिल हृदय माझ्यापासून दूर राहील;
अनीतीच्या कुठल्याच गोष्टीशी मी संबंध ठेवणार नाही.
5 आपल्या शेजार्यांची गुप्तपणे निंदानालस्ती करणार्यास,
मी नष्ट करेन;
दुसर्यांकडे तुच्छतेने पाहणार्याचा व अहंकारी हृदयाच्या मनुष्याचा
सहवास मला असह्य वाटेल.
6 देशातील निष्ठावान लोकांवर मी माझी दृष्टी लावेन,
जेणेकरून ते माझ्या सहवासात राहतील;
ज्यांचे आचरण दोषरहित असेल,
असेच लोक माझी सेवा करतील.
7 परंतु जे इतरांची फसवणूक करतात,
अशांना मी माझ्या घरात राहू देणार नाही,
आणि जे असत्य बोलतात,
ते माझ्यापुढे उपस्थित राहणार नाहीत.
8 दररोज सकाळी
मी आपल्या राज्यातील दुर्जनांना नष्ट करेन;
याहवेह देवाच्या या नगरीतील
प्रत्येक दुष्टाचा मी नायनाट करेन.