स्तोत्र 102
संकटसमयीच्या आक्रांत पुरुषाची अभ्यर्थना. तो अत्यंत उदास आहे आणि याहवेहच्या समोर स्वतःच्या हृदय-वेदनेचे वर्णन करीत आहे. 
  1 हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका;  
माझी मदतीची विनवणी तुमच्यापर्यंत पोहचो.   
 2 मी संकटसमयात असता  
तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका.  
जेव्हा मी तुमचा धावा करेन तेव्हा मला त्वरेने उत्तर द्या;  
तुमचे कान माझ्याकडे लावा.   
 3 कारण माझे दिवस धुरासारखे विरून जात आहेत;  
माझ्या हाडांचा जळत्या कोळशासारखा दाह होत आहे.   
 4 माझे हृदय गवताप्रमाणे करपून व कोमेजून गेले आहे;  
अन्न सेवन करण्याचेही मला स्मरण होत नाही.   
 5 निराशेने आता अधिकच उच्चस्वरात कण्हत असून  
मी कातडी व हाडे यांचा सापळा झालो आहे.   
 6 ओसाड प्रदेशातील घुबडासारखा,  
भग्नावशेषातील घुबडासारखा मी झालो आहे.   
 7 मी जागाच राहतो.  
छपरावर एकाकी असणार्या पक्ष्यासारखा मी झालो आहे.   
 8 माझे शत्रू दिवसेंदिवस मला टोचून बोलतात;  
आणि माझा उपहास करणारे माझे नाव एखाद्या श्रापासारखे देतात.   
 9 मी अन्न म्हणून राख खात आहे;  
आणि माझे अश्रू माझ्या पेयात मिश्रित होतात,   
 10 तुम्ही माझ्यावर क्रोधाविष्ट झाला आहात;  
कारण संतापाने तुम्ही मला उचलून फेकून दिले.   
 11 सायंकाळच्या सावलीप्रमाणे माझे आयुष्य वेगाने संपत आहे;  
मी गवताप्रमाणे वाळून जात आहे.   
 12 परंतु हे याहवेह देवा, तुम्ही सदासर्वकाळ सिंहासनावर विराजमान आहात;  
तुमची किर्ती पिढ्यान् पिढ्या टिकून राहील.   
 13 तुम्ही याल आणि सीयोनावर दया कराल,  
कारण तिच्यावरील कृपादृष्टीची वेळ येऊन ठेपली आहे;  
तो निश्चित समय आलेला आहे.   
 14 यातील प्रत्येक धोंड्यावर तुमचे सेवक प्रीती करतात;  
येथील धूळ देखील त्यांचे मन द्रवित करते.   
 15 सर्व राष्ट्रे तुमच्या नामाचे भय धरतील,  
पृथ्वीवरील सर्व राजे तुमच्या गौरवासमोर नतमस्तक होतील.   
 16 कारण याहवेह सीयोनाची पुनर्बांधणी करतील;  
आणि त्यांच्या गौरवाने प्रगट होतील.   
 17 निराधार लोकांच्या प्रार्थना ते ऐकतील;  
त्यांच्या विनवण्यांचा ते तिरस्कार करणार नाहीत.   
 18 भावी पिढ्यांच्या हितासाठी हे सर्व नमूद करून ठेवले जावो,  
जे आजपर्यंत अस्तित्वात नाहीत, तेही याहवेहची स्तुती करतील:   
 19 “याहवेहने आपल्या महान पवित्रस्थानातून खाली दृष्टी टाकली,  
त्यांनी स्वर्गातून पृथ्वीकडे पाहिले,   
 20 जेणेकरून गुलामगिरीतील लोकांचे कण्हणे ऐकावे  
आणि मृत्युदंड मिळालेल्यांची सुटका करावी.”   
 21 म्हणजे सर्व लोक याहवेह देवाची महिमा सीयोनात जाहीर करतील  
आणि यरुशलेमात त्यांची स्तुती करतील.   
 22 जेव्हा लोक व राष्ट्रेही  
याहवेहची उपासना करण्यासाठी तिथे येतील.   
 23 माझ्या जीवनयात्रेच्या मध्येच त्यांनी माझे बळ तोडले;  
त्यांनी माझे आयुष्य कमी केले.   
 24 पण मी त्यांना आरोळी मारली:  
“हे परमेश्वरा, आयुष्याच्या मध्यातच मला मृत्यू येऊ देऊ नका;  
तुमची वर्षे पिढ्यान् पिढ्या निरंतर असतात.   
 25 प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला,  
आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत.   
 26 ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल;  
ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील;  
जुनी वस्त्रे टाकून नवी घालावी,  
तसे तुम्ही त्यांना बदलून टाकाल.   
 27 परंतु तुम्ही निरंतर समान राहणार,  
आणि तुमची वर्षे कधीही संपुष्टात येणार नाहीत.   
 28 तुमच्या सेवकांचे संतान तुमच्या उपस्थितीत टिकून राहतील;  
तुमच्या संरक्षणाखाली त्यांच्या वंशजांचे जतन होईल.”