स्तोत्र 104
 1 हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.  
हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, तुम्ही किती थोर आहात;  
तुम्ही राजवैभव आणि तेजाने विभूषित आहात.   
 2 तुम्ही प्रकाशास वस्त्रासमान धारण केले आहे;  
अंतराळास एखाद्या तंबूप्रमाणे विस्तीर्ण केले आहे,   
 3 आणि आपल्या मजल्यांना जलस्तंभावर बसविले आहे.  
मेघ त्यांचे रथ आहेत;  
ते वार्याच्या पंखावर आरूढ होऊन जातात.   
 4 ते वायूला आपले दूत;  
व अग्निज्वालांना आपले सेवक करतात.   
 5 तुम्ही पृथ्वीला तिच्या पायावर असे स्थापित केले आहे,  
जे कधीही ढळणार नाही.   
 6 तुम्ही पृथ्वीला गहन जलाशयरूपी वस्त्राने आच्छादिले;  
जलस्तर पर्वतापेक्षा उंच केले.   
 7 परंतु तुम्ही धमकाविताच जलसंचयाने पलायन केले,  
तुमच्या गर्जनेच्या आवाजाने ते भिऊन पळाले;   
 8 ते पाणी पर्वतांवरून वाहिले,  
दर्याखोर्यातून गेले,  
आणि तुम्ही नेमलेल्या पातळ्यांवर ते स्थिर झाले.   
 9 तुम्ही त्यांना मर्यादा ठरवून दिली;  
जेणेकरून त्यांनी पृथ्वी पुन्हा कधीही व्यापून टाकू नये.   
 10 त्यांनी खोर्यांमधून पाण्याचे वाहते झरे केले;  
पर्वतामधून त्यांचे प्रवाह वाहत गेले.   
 11 ते कुरणातील सर्व प्राण्यांना पाणी पुरवितात;  
त्या ठिकाणी रानगाढवेही आपली तहान भागवितात.   
 12 आकाशातील पक्षी त्या प्रवाहाकाठी घरटी बांधून राहतात;  
व वृक्षांच्या फांद्यांवरून गाणी गातात.   
 13 ते त्यांच्या भवनाच्या वरच्या कक्षातून पर्वतावर पाऊस पाडतात;  
पृथ्वी त्यांच्या फलवंत कार्याने समाधान पावते.   
 14 ते जनावरांच्या पोषणाकरिता गवत उत्पन्न करतात,  
आणि मानवाने मशागत करावी—  
जमिनीतून अन्न उत्पादन करावे म्हणून:   
 15 मानवाचे हृदय उल्हासित करण्यास द्राक्षारस,  
त्याचे मुख तुळतुळीत राखण्यासाठी तेल  
आणि त्याच्या हृदयाचे जतन व्हावे म्हणून भाकर उत्पन्न करतात.   
 16 याहवेहने लावलेल्या लबानोनाच्या  
गंधसरू वृक्षास भरपूर पाणी पुरवठा असतो.   
 17 त्यावर पक्षी आपली घरटी करतात  
व करकोचा त्याचे घरटे देवदारू वृक्षावर बांधतो.   
 18 उंच पर्वत रानबकर्यांचे निवासस्थान आहेत,  
खडकांमध्ये डोंगरी ससे सुरक्षित बिळे करतात.   
 19 त्यांनी ऋतुंची नोंद करण्यासाठी चंद्राची निर्मिती केली,  
आणि सूर्यास कधी अस्त व्हावे हे ठाऊक आहे.   
 20 ते अंधार पाठवितात आणि रात्र होते,  
तेव्हा वनचर भक्ष्यार्थ बाहेर पडतात.   
 21 सिंह भक्ष्यासाठी गर्जना करतात,  
आणि त्यांचे अन्न परमेश्वराकडून अपेक्षितात.   
 22 सूर्योदयाच्या वेळी ते आपल्या गुहांमध्ये परत येऊन लपतात,  
व शांतपणे झोपतात.   
 23 मग लोक त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडतात,  
व सायंकाळपर्यंत परिश्रम करतात.   
 24 हे याहवेह! तुमचे कार्य किती विविध आहे:  
अद्भुत ज्ञानाने तुम्ही सर्व घडविले आहे;  
तुमच्या रचनेने संपूर्ण पृथ्वी संपन्न झाली आहे.   
 25 एकीकडे प्रचंड व विस्तृत महासागर पसरलेला आहे;  
त्यात लहानमोठ्या अशा  
असंख्य प्राण्यांची रेलचेल आहे.   
 26 यात जहाजांचे दळणवळण होत असते,  
आणि यात क्रीडा करण्यासाठी तुम्ही लिव्याथान निर्माण केला.   
 27 निर्धारित वेळेवर अन्न मिळण्यासाठी,  
प्रत्येक प्राणी आशेने तुमच्याकडे बघतो.   
 28 जेव्हा तुम्ही त्यांना पुरविता,  
तेव्हा ते गोळा करतात;  
तुम्ही आपला हात पूर्णपणे उघडता  
आणि तुमच्या विपुल पुरवठ्याने ते तृप्त होतात.   
 29 परंतु जेव्हा तुम्ही आपले मुख लपविता,  
तेव्हा ते व्याकूळ होतात;  
जेव्हा तुम्ही त्यांचा श्वास काढून घेता,  
तेव्हा ते मरतात व पुन्हा मातीत जाऊन मिसळतात.   
 30 मग तुम्ही आपला आत्मा पाठविता,  
तेव्हा ते अस्तित्वात येतात,  
आणि पृथ्वीला पुन्हा नवे स्वरूप आणता.   
 31 याहवेहचे वैभव सर्वकाळ राहो;  
याहवेहला आपल्या कृतीपासून आनंद होवो—   
 32 त्यांच्या नेत्रकटाक्षांनी पृथ्वी थरथर कापते;  
ते स्पर्श करताच पर्वतातून धुराचे लोट बाहेर पडतात.   
 33 मी आजीवन याहवेहचे स्तोत्र गाईन;  
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या परमेश्वराचे स्तुतिगान करेन.   
 34 माझे चिंतन त्यांना संतुष्ट करो,  
कारण याहवेहतच माझा आनंद परिपूर्ण आहे.   
 35 सर्व पातकी पृथ्वीवरून नष्ट होवोत;  
दुष्ट परत न दिसोत.  
हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.  
याहवेहचे स्तवन कर!