स्तोत्र 105
 1 याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा;  
त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रात जाहीर करा.   
 2 त्यांची स्तुतिस्तोत्रे गा आणि त्यांचे स्तवन करा;  
त्यांच्या सर्व अद्भुत कार्याचे वर्णन करा.   
 3 त्यांच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा;  
जे याहवेहचा शोध करतात, त्यांचे हृदय हर्षित होवो.   
 4 याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा;  
सतत त्यांचे मुख शोधा.   
 5 परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये,  
त्यांचे चमत्कार आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा.   
 6 अहो त्यांचे सेवक, अब्राहामाच्या वंशजांनो,  
त्यांच्या निवडलेल्या लोकांनो, याकोबाच्या संतानांनो, स्मरण करा.   
 7 कारण याहवेह आमचे परमेश्वर आहेत.  
त्यांचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत.   
 8 जी अभिवचने त्यांनी हजारो पिढ्यांना दिली होती,  
ते आपला करार सर्वदा स्मरणात ठेवतात.   
 9 हा करार त्यांनी अब्राहामाशी केला,  
आणि इसहाकाशी शपथ वाहिली,   
 10 आणि त्यांनी याकोबासाठी नियम  
व इस्राएलसाठी सदासर्वकाळचा करार या रूपाने कायम केला:   
 11 “मी तुम्हाला कनान देश  
तुमचे वतन म्हणून देईन.”   
 12 त्यावेळी इस्राएली लोक अगदी मोजके होते  
निश्चितच थोडे, वचनदत्त देशात ते परके होते.   
 13 ते एका देशातून दुसर्या देशात,  
एका राज्यातून दुसर्या राज्यात भटकत असताना,   
 14 याहवेहने कोणा मनुष्याला त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही;  
त्यांच्याकरिता त्यांनी राजांना दटाविले:   
 15 “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका;  
माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”   
 16 त्यांनी त्यांच्या देशावर दुष्काळ आणला,  
आणि त्यांचा अन्नपुरवठा तोडून टाकला.   
 17 तेव्हा त्यांनी एका पुरुषाला—  
योसेफाला पाठविले.   
 18 इजिप्तींनी योसेफाच्या पायांना खोडे घालून इजा केली,  
त्याची मान लोखंडी गळपट्ट्यात अडकविली.   
 19 याहवेहने ठरविलेली वेळ येईपर्यंत,  
त्यांनी दिलेले अभिवचन पूर्णपणे पारखले जाईपर्यंत हे घडले.   
 20 मग राजाने त्याला बोलाविणे पाठविले आणि त्याला मुक्त केले,  
प्रजेच्या शासकाने त्याला सोडविले.   
 21 राजाने त्याला महालाचा प्रशासक म्हणून नेमले,  
सर्व मालमत्तेवर त्याला अधिकार दिला.   
 22 त्याच्या राजपुत्रांचा सल्लागार,  
आणि राजाच्या मंत्र्यांना बोध देण्यासाठी त्याची नेमणूक झाली.   
 23 नंतर याकोब, म्हणजे इस्राएल इजिप्तमध्ये आला;  
आणि उपरा म्हणून हाम वंशजांच्या देशात राहिला.   
 24 याहवेहने इस्राएली लोकांना अत्यंत समृद्ध केले;  
त्यांच्या शत्रूपेक्षाही त्यांची लोकसंख्या अधिक झाली,   
 25 त्यांच्या सेवकांविरुध्द कट करण्यासाठी  
परमेश्वराने इजिप्ती लोकांचे मन फिरविले.   
 26 तेव्हा परमेश्वराने आपले प्रतिनिधी म्हणून मोशेला  
व अहरोनाला निवडून पाठवले.   
 27 त्यांनी इजिप्ती समोर याहवेहचे चमत्कार केले,  
हामच्या भूमीवर त्यांची अद्भुत कार्ये प्रकट केली.   
 28 परमेश्वराने अंधकार पाठवून त्या संपूर्ण देशाला अंधकारमय केले—  
कारण त्यांनी परमेश्वराच्या आदेशाची अवहेलना केली नाही का?   
 29 त्यांनी इजिप्तच्या सर्व पाण्याचे रक्त केले,  
आणि परिणामतः त्यातील मासे मरून गेले.   
 30 मग त्या राष्ट्रात प्रचंड संख्येने बेडके उत्पन्न झाली,  
राजाच्या शयनकक्षात देखील ती पोहोचली.   
 31 ते बोलले आणि गोमाश्यांचे,  
आणि कीटकांचे थवे प्रचंड प्रमाणात संपूर्ण देशावर आले.   
 32 पावसाच्या पाण्याचे गारात रूपांतर केले,  
आणि विजेच्या अग्निलोळांनी त्या राष्ट्रावर वर्षाव केला.   
 33 त्यांचे द्राक्षवेल आणि अंजिराची झाडे त्यांनी उद्ध्वस्त केली,  
देशातील सर्व झाडे कोलमडून पडली.   
 34 त्यांनी आदेश दिला आणि टोळांनी आक्रमण केले,  
टोळांचे थवेच्या थवे आले;   
 35 त्यांनी देशातील सर्व हिरवळ खाऊन टाकली,  
आणि सर्व पिके गिळंकृत केली.   
 36 मग त्यांनी त्यांच्या देशातील प्रत्येक ज्येष्ठ संतानास ठार केले,  
जे त्यांच्या पुरुषत्वाचे प्रथमफळ होते.   
 37 त्यांनी इस्राएलास विपुल चांदी आणि सोन्यासह इजिप्तमधून बाहेर काढले,  
त्यावेळी त्यांच्या गोत्रातील कोणीही अडखळले नाही.   
 38 इस्राएली लोक गेल्यावर इजिप्ती लोकांना आनंद झाला,  
कारण इस्राएलाच्या भयाने ते ग्रासले होते.   
 39 याहवेहनी इस्राएलावर मेघाचे छत्र पसरले,  
आणि रात्री प्रकाशासाठी अग्निस्तंभ दिला.   
 40 त्यांनी याचना केली, तेव्हा परमेश्वराने लावे पक्षी पाठविले;  
त्यांना स्वर्गातील भाकर देऊन तृप्त केले.   
 41 त्यांनी खडक फोडला आणि पाणी उफाळून बाहेर आले;  
त्याची नदी होऊन ती वैराण प्रदेशातून वाहू लागली.   
 42 कारण आपला सेवक अब्राहाम  
याला दिलेल्या पवित्र अभिवचनाची त्यांना आठवण होती.   
 43 त्यांनी त्यांच्या लोकांना आनंदाची गाणी गात,  
व आपल्या निवडलेल्यांना हर्षनाद करीत बाहेर आणले;   
 44 परमेश्वराने अनेक राष्ट्रांची भूमी यांना दिली,  
परक्यांनी परिश्रम केलेल्या संपत्तीचे ते वारस झाले—   
 45 जेणेकरून इस्राएली लोक त्यांचे विधिनियम  
व त्यांची आज्ञा दक्षतेने पाळतील.  
याहवेहची स्तुती*किंवा हालेलू याह असो.