स्तोत्र 115
 1 आमचे नको, हे याहवेह, आमचे नको,  
तुमची प्रेमदया आणि तुमच्या विश्वसनीयते निमित्त,  
तुमचेच नाव गौरवित होवो.   
 2 इतर राष्ट्र असे का म्हणतात,  
“यांचा परमेश्वर कुठे आहे?”   
 3 आमचे परमेश्वर तर स्वर्गात आहेत;  
त्यांना जे योग्य वाटते, तेच ते करतात.   
 4 पण त्या तर मानवी हातांनी बनविलेल्या  
चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती आहेत.   
 5 त्यांना तोंडे आहेत, पण बोलता येत नाही,  
त्यांना डोळे आहेत, पण ते बघू शकत नाहीत.   
 6 त्यांना कान आहेत, पण ऐकू येत नाही,  
नाक असून वासही येत नाही.   
 7 त्यांना हात असून स्पर्श करता येत नाही,  
पाय आहेत पण चालता येत नाही;  
त्यांच्या कंठातून कुठलाही ध्वनी बाहेर पडत नाही.   
 8 मूर्ती घडविणारे त्यांच्यासारखेच होतील,  
आणि त्यांच्यावर भरवसा ठेवणारेही तसेच होतील.   
 9 हे समस्त इस्राएला, याहवेहवर भरवसा ठेव—  
तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत.   
 10 अहो अहरोनाच्या वंशजांनो, याहवेहवर भरवसा ठेवा—  
तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत.   
 11 अहो देवाचे भय मानणारे लोकहो, याहवेहवर भरवसा ठेवा—  
तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत.   
 12 याहवेह आमची आठवण ठेवतात, ते आम्हाला आशीर्वाद देतील:  
ते इस्राएली लोकांना आशीर्वाद देतील,  
ते अहरोनाच्या वंशजांना आशीर्वाद देतील,   
 13 आणि जे याहवेहचे भय बाळगतात त्यांना आशीर्वाद देतील—  
सर्व लहानथोरांना एकसमान.   
 14 याहवेह तुम्हाला समृद्ध करो,  
तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांनाही.   
 15 याहवेह, ज्यांनी आकाश व पृथ्वी निर्माण केली तेच,  
तुम्हाला आशीर्वादित करोत.   
 16 सर्वोच्च स्वर्ग याहवेहचा आहे,  
परंतु त्यांनी पृथ्वी मानवजातीला दिलेली आहे.   
 17 मृतक व चिरनिद्रा घेणारे,  
याहवेहची स्तुतिस्तोत्रे गात नसतात.   
 18 परंतु आम्हीच याहवेहची स्तोत्रे गातो,  
आता आणि सदासर्वकाळ.  
याहवेहचे स्तवन करा.