स्तोत्र 116
 1 मी याहवेहवर प्रीती करतो, कारण त्यांनी माझी वाणी ऐकली;  
माझी दयेची विनवणी ऐकली.   
 2 कारण त्यांनी आपला कान माझ्या हाकेकडे लावला,  
म्हणून आजीवन मी त्यांचा धावा करीत राहीन.   
 3 मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले होते;  
कबरेच्या भयाने मला ग्रासले,  
दुःख व क्लेशांनी माझ्यावर मात केली होती.   
 4 तेव्हा मी याहवेहचा धावा करून म्हणालो:  
“हे याहवेह, मला वाचवा!”   
 5 याहवेह कृपाळू आणि नीतिमान आहेत;  
आपले परमेश्वर करुणामय आहेत.   
 6 याहवेह साध्याभोळ्या लोकांचे रक्षण करतात;  
मी गर्तेत ओढला गेलो असताना, त्यांनी मला वाचविले.   
 7 हे माझ्या जिवा, पुन्हा एकदा शांतचित्त हो,  
कारण याहवेहने तुझे भले केले आहे.   
 8 कारण हे याहवेह, तुम्ही मला मृत्यूपासून सोडविले,  
माझे डोळे अश्रूंपासून  
आणि माझे पाय अडखळण्यापासून रक्षिले आहेत.   
 9 जेणेकरून मी जिवंत लोकांमध्ये राहून,  
याहवेहच्या समक्षतेत चालू शकेन.   
 10 जेव्हा मी याहवेहवर विश्वास ठेवला तेव्हा मी बोललो,  
“मी फार पीडित आहे;”   
 11 घोर निराशेच्या भरात मी म्हणालो,  
“प्रत्येक मनुष्य लबाड आहे.”   
 12 परंतु याहवेहचे माझ्यावरील सर्व उपकार,  
मी कसे फेडणार?   
 13 मी तारणाचा प्याला उंच करून,  
याहवेहच्या नावाचा धावा करेन.   
 14 मी याहवेहस केलेले नवस  
त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.   
 15 याहवेहच्या दृष्टीने,  
त्यांच्या निष्ठावानांचा मृत्यू अतिशय मोलवान आहे.   
 16 हे याहवेह, मी निश्चितच तुमचा सेवक आहे;  
माझ्या मातेसमान मी देखील तुमची सेवा करेन;  
मला तुम्ही बंधन मुक्त केले आहे.   
 17 मी तुम्हाला उपकारस्तुतीचे अर्पण करेन,  
आणि याहवेहच्या नामाचा धावा करेन.   
 18 मी याहवेहस केलेले नवस  
त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.   
 19 यरुशलेमात, तुमच्यासमक्ष  
याहवेहच्या या मंदिराच्या अंगणात ते पूर्ण करेन.  
याहवेहचे स्तवन करा.