स्तोत्र 121
प्रवाशांचे आराधना गीत.
मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो—
मला साहाय्य कुठून येईल?
स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते याहवेह,
तेच माझ्या साहाय्यतेचा उगम आहेत.
 
ते तुझा पाय कदापि घसरू देणार नाहीत;
तुझे रक्षक डुलकीही घेत नाही.
खरोखर जे इस्राएलचे रक्षक आहेत ते झोपी जात नाहीत
किंवा डुलकीही घेत नाहीत.
 
याहवेह स्वतः तुझे रक्षण करतात—
याहवेह तुझ्या उजव्या हाताजवळ सावलीसारखे आहेत.
दिवसाच्या सूर्याची तुला बाधा होणार नाही,
आणि रात्रीच्या चंद्राची देखील नाही.
 
याहवेह सर्व अनिष्टांपासून तुला सुरक्षित ठेवतील—
आणि तुझ्या जिवाचे रक्षण करतील.
तुझे आता आणि सर्वकाळ येणे व जाणे,
यावर याहवेह बारकाईने लक्ष ठेवतील.