स्तोत्र 122
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.
मी हर्षित झालो, जेव्हा ते मला म्हणाले,
“चला आपण याहवेहच्या मंदिरात जाऊ.”
अगे यरुशलेमे, आम्ही आता आपले पाऊल
तुझ्या वेशीच्या आत ठेवले आहे.
 
यरुशलेम नगरी अशी बांधलेली आहे,
जशी एखादी सुसंबद्धपणे रचलेली नगरी.
हेच ते स्थान आहे जिथे इस्राएलास दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व कुळे—
याहवेहची कुळे—
याहवेहची उपकारस्तुती करण्यास
येथे जमत आहेत.
इथेच न्याय-सिंहासन, दावीदाच्या वंशाचे
सिंहासन स्थापित केले आहे.
 
यरुशलेमवरील शांतीसाठी प्रार्थना करा की
या नगरीवर प्रीती करणार्‍या सर्वांची सुरक्षा होवो.
तुझ्या तटांच्या आत शांती नांदो;
तुझ्या राजवाड्यामध्ये सुरक्षितता राहो.
जे माझे कुटुंब व माझे स्नेही येथे राहतात, त्यांच्यासाठी मी मागतो,
“तुझ्यामध्ये शांती नांदो.”
आपले परमेश्वर याहवेह, यांच्या मंदिराप्रीत्यर्थ,
तुझा उत्कर्ष व्हावा, अशी अभिलाषा करेन.