स्तोत्र 123
प्रवाशांचे आराधना गीत.
1 मी माझी दृष्टी वर, तुमच्याकडे लावतो,
तुम्ही जे स्वर्गात राजासनारूढ आहात.
2 जसा एखादा दास आपली दृष्टी आपल्या धन्याच्या हाताकडे लावतो,
किंवा एखादी दासी आपल्या धनिणीच्या हाताकडे नजर लावते,
तसेच दया आणि कृपा प्राप्त व्हावी म्हणून,
आमची दृष्टी आमचे परमेश्वर याहवेहकडे लागलेली असते.
3 आम्हावर दया करा, हे याहवेह, आम्हावर दया करा,
कारण आम्ही पुष्कळ तिरस्कार सहन केला आहे.
4 उन्मत्त लोकांचा घोर उपहास आम्ही सहन केला
आणि गर्विष्ठांच्या घोर घृणेचे
पात्र ठरलो आहे.