स्तोत्र 127
प्रवाशांचे एक आराधना गीत. शलोमोनाची रचना.
याहवेहने घर बांधले नाही,
तर बांधकाम करणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत;
याहवेहने शहराचे रक्षण केले नाही,
तर पहारेकर्‍यांचे जागणे व्यर्थ आहे.
तुमचे पहाटे उठणे
आणि रात्री उशीरापर्यंत
अन्नप्राप्तीसाठी कष्ट करणे व्यर्थ आहे—
कारण आपल्या प्रियजनांस याहवेहच शांत झोप देतात.
 
मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे,
प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे.
तरुणपणी झालेली मुले,
शूरवीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.
ज्या पुरुषाचा भाता
अशा बाणांनी भरलेला आहे, तो धन्य!
असे पुरुष वेशीत आपल्या शत्रूशी न्यायालयात वाटाघाटी करतील,
तेव्हा ते लज्जित होणार नाहीत.