स्तोत्र 126
प्रवाशांचे आराधना गीत.
जेव्हा याहवेहनी सीयोनाला पुन्हा एकवार संपन्न केले*किंवा जेव्हा इस्राएलला बंदिवासातून परत आणले,
तेव्हा आम्ही स्वप्न पाहत होतो असे वाटले.
आमचे मुख हास्याने भरले होते
आणि किती हर्षगीते आम्ही गाईली!
तेव्हा विधर्मी राष्ट्रे म्हणाली:
“पाहा याहवेहने त्यांच्यासाठी किती थोर कृत्ये केली आहेत.”
याहवेहने आमच्यासाठी महान कृत्ये केलेली आहेत,
आणि आम्ही आनंदाने परिपूर्ण झालो आहोत.
 
हे याहवेह, नेगेव नदीसारखी,
आमची समृद्धी परत आम्हाला मिळू द्याम्हणजे आमच्या बंदिवासांना परत आणा..
जे अश्रूंनी पेरणी करतात,
ते आनंदाने कापणी करतील.
जे रडत पेरणीसाठी
बी घेऊन जातात,
ते आपल्या पेंढ्या घेऊन,
आनंदाने हर्षगीते गात परत येतील.

*स्तोत्र 126:1 किंवा जेव्हा इस्राएलला बंदिवासातून परत आणले

स्तोत्र 126:4 म्हणजे आमच्या बंदिवासांना परत आणा.