स्तोत्र 133
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.
ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते,
जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात,
 
ते अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या मोलवान तेलासमान,
त्याच्या दाढीवर ओघळलेल्या,
अहरोनाच्या दाढीवर ओघळलेल्या,
झग्याच्या काठापर्यंत आलेल्या सुगंधी तेलाप्रमाणे आहे.
हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्‍या
हर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे.
कारण हे ते स्थान आहे,
ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे.