स्तोत्र 136
 1 याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 2 देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 3 प्रभूंच्या प्रभूचे आभार माना,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 4 केवळ तेच असे महान चमत्कार करू शकतात,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 5 ज्यांनी आपल्या बुद्धिसामर्थ्याने स्वर्गाची निर्मिती केली,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 6 त्यांनी जलावर पृथ्वीचा विस्तार केला,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 7 त्यांनी प्रचंड ज्योती निर्माण केल्या—   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 8 दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 9 रात्रीवरील प्रभुत्वासाठी चंद्र व तारे निर्माण केले;   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 10 त्यांनी इजिप्ती लोकांच्या प्रथम संतानास मारून टाकले,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 11 त्यांनी इस्राएलास त्यांच्या तावडीतून सोडविले,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 12 ज्यांनी आपल्या सशक्त हातांनी व विस्तारलेल्या भुजांनी त्यांना सोडविले,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 13 तांबडा समुद्र दुभागला,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 14 आणि इस्राएली लोकांना त्यामधून सुखरुपपणे पार नेले,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 15 परंतु फारोह आणि त्याचे सैन्य तांबड्या समुद्रात बुडवून टाकले;   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 16 ज्यांनी आपल्या लोकांना अरण्यातून नेले,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 17 ज्यांनी प्रबळ राजांचा नायनाट केला,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 18 ज्यांनी प्रतापी राजांना ठार केले—   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 19 ज्यांनी अमोरी लोकांचा राजा सीहोन याला,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 20 आणि बाशान प्रांताचा राजा ओग यालाही—   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 21 आणि त्यांची भूमी इस्राएलला कायमचे वतन म्हणून,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 22 ज्यांनी आपला सेवक इस्राएल याला वारसा म्हणून दिली,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 23 ज्यांनी आमच्या पराकाष्ठेच्या दुबळेपणात आमची आठवण केली,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 24 आणि त्यांनी आम्हाला शत्रूपासून सोडविले,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 25 ते सर्व प्राणिमात्राला अन्नपुरवठा करतात,   
त्यांची करुणा सनातन आहे.  
 26 स्वर्गातील परमेश्वराचे उपकारस्मरण करा,   
त्यांची करुणा सनातन आहे.