स्तोत्र 137
आम्ही बाबेलच्या नदीकाठावर बसलो आणि
सीयोनाची आठवण करीत रडलो.
आम्ही आमच्या वीणा
वाळुंजाच्या फांद्यावर टांगल्या,
कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले,
आमचा छळ करणार्‍यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली,
ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!”
 
या परदेशात आमच्या याहवेहचे
स्तवनगीत गाणे आम्हाला कसे शक्य आहे?
हे यरुशलेम, मी तुला विसरलो,
तर माझा उजवा हात त्याचे कौशल्य विसरो;
जर मी यरुशलेमला माझा
सर्वोच्च आनंद मानत नसेन,
तर माझी जीभ
माझ्या टाळूला चिकटो.
 
हे याहवेह, माझ्या देवा, यरुशलेमचा पाडाव झाला
त्या दिवशी एदोमाच्या वंशजांनी काय केले याचे स्मरण करा.
ते आरोळ्या मारत होते, “तिला जमीनदोस्त करा,
तिचा पाया देखील ढासळून टाका.”
अगे बाबेलच्या कन्ये, तुझा नाश निश्चित आहे;
तू जसा आमचा नाश केलास,
तसा तुझी परतफेड करणारा धन्य होईल.
जो तुझी तान्ही बालके घेऊन,
त्यांना खडकावर आपटेल, तो धन्य!