स्तोत्र 142
दावीदाची मासकीलज्यावेळी तो गुहेमध्ये होता. एक अभ्यर्थना
मी अगदी काकुळतीला येऊन याहवेहला विनवणी करतो;
मी उच्चस्वरात याहवेहला दयेची विनंती करतो.
माझी तक्रार मी त्यांच्यापुढे ओतत आहे,
आणि माझे कष्ट मी त्यांच्यासमोर प्रकट करत आहे.
 
कारण माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे,
तुमच्यासमोर माझी नियती नेहमी स्पष्ट असते.
माझ्या शत्रूंनी
माझ्या मार्गात सापळे लावले आहेत.
ते पाहा! माझ्या उजवीकडे मला साहाय्य करणारा कोणीही नाही;
माझी कोणालाही पर्वा नाही.
मला काहीच आश्रय नाही;
माझ्या जिवाची कोणासही चिंता नाही.
 
मी याहवेहचा धावा करतो;
मी म्हटले, “तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात,
जिवंतांच्या भूमीत तुम्हीच माझे विधिलिखित आहात.”
 
माझा धावा ऐका,
कारण मी अत्यंत निराशाजनक मनःस्थितीत आहे;
माझा छळ करणार्‍यांपासून तुम्ही मला मुक्त करा,
कारण ते माझ्यापेक्षा अत्यंत बलिष्ठ आहेत.
मला बंदिवासातून मुक्त करा,
म्हणजे मला तुमची उपकारस्तुती करता येईल;
मग तुम्ही मला साहाय्य केले,
म्हणून नीतिमान लोक माझ्याबरोबर आनंदोत्सव करतील.