3
सार्दीस येथील मंडळीस
1 “सार्दीस येथील मंडळीच्या देवदूताला लिही:
ज्यांच्याजवळ परमेश्वराचे सात आत्मे व सात तारे आहेत, ते असे म्हणतात:
तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत, तुम्ही जिवंत आहात असे तुमच्याविषयी मत आहे, पण तुम्ही मेलेले आहात. 2 जागृत व्हा! जे उरलेले आहेत व मरणाच्या पंथास लागले आहे त्यांना बळकट करा, कारण तुमची कृत्ये माझ्या परमेश्वराच्या दृष्टीने मला परिपूर्ण अशी आढळली नाहीत. 3 जे तुम्ही प्रथम ऐकले व स्वीकारले, त्याची आठवण करा आणि त्यावर दृढविश्वास ठेऊन पश्चात्ताप करा. कारण तुम्ही जागृत झाला नाही, तर जसा चोर येतो तसा मी येईन आणि मी कोणत्या घटकेस तुमच्याकडे येईन हे तुम्हाला मुळीच समजणार नाही.
4 मात्र ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत, असे थोडे लोक सार्दीस येथे तुमच्यामध्ये आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील कारण ते त्यास पात्र आहेत. 5 जो विजय मिळवितो तो त्यांच्यासारखा शुभ्र वस्त्रे परिधान करेल. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून कधीच खोडणार नाही. तर माझ्या पित्यासमोर व त्यांच्या देवदूतांसमोर मी त्याच्या नावाचा जाहीरपणे स्वीकार करेन. 6 ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको.
फिलदेल्फिया येथील मंडळीस
7 “फिलदेल्फिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही:
जे पवित्र व सत्य आहे, ज्यांच्याजवळ दावीदाची किल्ली आहे, ते जे उघडतात, ते कोणालाही बंद करता येत नाही आणि ते जे बंद करतात, ते कोणाला उघडता येत नाही, ते असे म्हणतात.
8 तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. मला माहीत आहे की तुमची शक्ती कमी आहे, तरी तुम्ही माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. 9 जे सैतानाच्या सभास्थानातील असून स्वतःला यहूदी म्हणतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांना मी तुमच्या स्वाधीन करेन. पाहा, ते तुमच्या पाया पडतील व मी तुमच्यावर प्रीती केली आहे हे ते स्वीकारतील. 10 धीर धरण्याविषयीच्या माझ्या आज्ञा तुम्ही पाळल्या आहेत, म्हणून पृथ्वीवर राहणार्या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुम्हाला राखीन.
11 मी लवकर येत आहे. तुमचा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुमच्याजवळ आहे, ते दृढ धरून ठेवा. 12 जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या परमेश्वराच्या मंदिरातील स्तंभ करेन. ते तिथून कधीही बाहेर जाणार नाहीत. माझ्या परमेश्वराचे नाव, स्वर्गातून माझ्या परमेश्वरापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या परमेश्वराची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव मी त्याच्यावर लिहेन. 13 ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ऐको.
लावदिकीया येथील मंडळीस
14 “लावदिकीया येथील मंडळीच्या देवदूताला लिही:
जे आमेन आहेत, विश्वासू व खरे साक्षी आणि परमेश्वराच्या सृष्टीचे शासक आहेत, ते असे म्हणतात.
15 तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. तुम्ही थंड नाही व उष्ण नाही. तुम्ही थंड किंवा उष्ण असता तर बरे झाले असते! 16 पण तुम्ही कोमट आहात, म्हणजे उष्ण नाही आणि थंडही नाही; म्हणून मी तुम्हाला माझ्या मुखातून बाहेर ओकून टाकीन. 17 तुम्ही म्हणता, ‘मी श्रीमंत आहे; हवे ते धन मिळविले आहे; मला कशाचीही उणीव नाही’ पण तुम्ही कष्टी, दीन, दरिद्री, आंधळे व नग्न आहात, हे तुम्हाला समजत नाही. 18 म्हणून तुम्हाला माझा असा सल्ला आहे की श्रीमंत होण्यासाठी तुम्ही माझ्याकडून अग्नीत शुद्ध केलेले सोने विकत घ्यावे. तुमची लज्जास्पद नग्नता झाकण्यात यावी म्हणून तुम्ही माझ्याकडून स्वच्छ, शुद्ध, शुभ्र वस्त्रे विकत घ्यावी. तुम्हाला दृष्टीलाभ व्हावा म्हणून तुम्ही माझ्याकडून अंजन विकत घ्यावे.
19 ज्यांच्यावर मी प्रीती करतो, त्यांना मी दटावतो व शिक्षा देऊन शिस्त लावतो. म्हणून आस्थावान होऊन पश्चात्ताप करावा. 20 पाहा! मी दाराशी उभा राहून, दार ठोठावीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, तर मी आत येईन; मी त्याच्याबरोबर भोजन करेन आणि तो माझ्याबरोबर भोजन करेल.
21 जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन, जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याबरोबर त्यांच्या राजासनावर बसलो. 22 ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ऐको.”