4
स्वर्गातील सिंहासन 
  1 यानंतर मी पाहिले, आणि माझ्यापुढे स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती व जी रणशिंग ध्वनीसारखी होती, ती म्हणाली, “इकडे वर ये, म्हणजे ज्यागोष्टी यानंतर घडणार आहेत त्या मी तुला दाखवेन”   2 मी लगेच आत्म्यात संचारलो, आणि माझ्यापुढे स्वर्गात एक राजासन ठेवलेले होते व त्यावर एकजण बसला होता.   3 आणि जो तिथे बसला होता तो हिर्यासारखा व माणकाच्या रत्नासारखा दिसत होता; त्या राजासनाच्या सभोवताली एक पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते;   4 राजासनाभोवती चोवीस सिंहासने होती आणि त्यावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते.   5 राजासनापासून विजा चमकत होत्या. आणि मेघगर्जनांचा आवाज ऐकू येत होता. राजासनासमोर परमेश्वराच्या सात आत्म्यांचे प्रतीक असलेले सात दीप तेवत होते.   6 त्याचप्रमाणे राजासनापुढे स्फटिकासारखे स्वच्छ आणि काचेच्या समुद्रासारखे दिसणारे असे काहीतरी होते.  
राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या भोवताली चार जिवंत प्राणी होते; त्यांना पुढे आणि मागे अंगभर डोळे होते.   7 या प्राण्यांपैकी पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा जो होता त्याचा चेहरा मनुष्याच्या मुखासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता.   8 त्या चारही सजीव प्राण्यांना प्रत्येकाला सहा पंख होते. त्यांच्या पंखांभोवती आतून बाहेरून सर्वत्र डोळे होते. ते अहोरात्र अखंडपणे बोलत होते:   
“पवित्र, पवित्र, पवित्र,  
ते सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहेत!*यश 6:3  
जे होते, जे आहेत आणि जे येणार आहेत.”  
 9 जे राजासनावर बसलेले आहेत आणि जे युगानुयुग जिवंत आहेत, त्यांचा त्या सजीव प्राण्यांनी ज्या ज्यावेळी गौरव केला, त्यांना बहुमान दिला आणि त्यांची उपकारस्तुती केली,   10 त्या त्यावेळी त्या चोवीस वडीलजनांनी त्या सर्वकाळ जिवंत असलेल्या परमेश्वरापुढे दंडवत घातले, त्यांची उपासना केली आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेऊन म्हटले:   
 11 “हे आमच्या प्रभू आणि परमेश्वरा,  
गौरव, आदर, सामर्थ्य स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात;  
कारण तुम्ही सर्व निर्माण केले.  
तुमच्याच इच्छेने सर्वकाही  
अस्तित्वात आले.”