19
बाबिलोनच्या पतनाबद्दल तिप्पट जयोत्सव
1 यानंतर मी ऐकले, स्वर्गात जणू काही एक मोठा जनसमुदाय गर्जना करून म्हणत आहे:
“हाल्लेलूयाह!
तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या परमेश्वराची आहेत!
2 कारण त्यांचे निर्णय सत्य व न्याय्य आहेत.
ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली होती,
तिला त्यांनी दंड केला आहे
आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.”
3 आणि पुन्हा त्यांनी घोषणा केली:
“हाल्लेलूयाह”
तिचा धूर सदासर्वकाळ वर जात आहे.
4 तेव्हा ते चोवीस वडीलजन व चार सजीव प्राणी यांनी राजासनावर बसलेल्या परमेश्वरासमोर दंडवत घालून त्यांना नमन करीत म्हटले,
“आमेन! हाल्लेलूयाह!”
5 तेव्हा राजासनातून एक वाणी निघाली. ती म्हणाली,
“परमेश्वराचे भय
बाळगणाऱ्या त्यांच्या
सर्व लहान थोर सेवकहो,
आपल्या परमेश्वराचे स्तवन करा.”
6 नंतर मी एका विराट लोक समुदायाची, पाण्याच्या उसळत्या प्रवाहासारखी गर्जना किंवा विजांच्या प्रचंड गडगडाटासारखी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली,
“हाल्लेलूयाह,
कारण आमचे प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, राज्य करतात!
7 चला, आपण आनंदोत्सव करू,
उल्लास करू व त्यांचे गौरव करू,
कारण कोकर्याच्या विवाहाची वेळ झाली आहे.
त्यांच्या वधूने स्वतःला सजविले आहे.
8 तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र
परिधान करावयास दिले आहे,”
ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र लोकांची नीतिकृत्ये आहेत.
9 तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, असे लिही “कोकराच्या विवाहाच्या मेजवानीस आमंत्रित केलेले ते धन्य!” तो मला असेही म्हणाला, “ही परमेश्वराची सत्यवचने आहेत.”
10 तेव्हा त्याला नमन करावे म्हणून मी त्याच्या पायांवर पडलो. पण त्याने मला म्हटले, “असे करू नको! कारण मी तुझ्यासारखा आणि येशूंवरील आपल्या विश्वासाची साक्ष देणार्या तुझ्या बांधवांसारखाच परमेश्वराचा एक सेवक आहे, परमेश्वरालाच नमन कर! कारण येशूंची साक्ष देणे हाच संदेशाचा आत्मा आहे.”
स्वर्गीय योद्धा पशूचा पराभव करतो
11 तेव्हा मी स्वर्ग उघडलेला पाहिला आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा व त्यावर जो बसला होता त्याचे नाव “विश्वासू आणि खरा” आहे. तो नीतीने न्याय आणि युद्ध करतो. 12 त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले होते ते त्याच्यावाचून कोणाला कळत नाही. 13 त्याने रक्तात बुचकळलेली वस्त्रे पांघरलेली होती. “परमेश्वराचा शब्द” हे त्याचे नाव होते. 14 स्वर्गातील सैन्य उत्तम, तलम, पांढरी स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि पांढर्या घोड्यांवर स्वार होऊन त्यांच्यामागून चालत होते. 15 “त्यांनी राष्ट्रांवर वार करावा म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण तलवार निघाली.”*स्तोत्र 2:9 ते त्यावर लोह-राजदंडाने अधिकार गाजवील आणि सर्वसमर्थ परमेश्वराच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड ते तुडवतील. 16 त्यांच्या वस्त्रावर व मांडीवर हे नाव लिहिलेले होते:
राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू.
17 नंतर मी एका देवदूताला सूर्यामध्ये उभा राहिलेला पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणार्या सर्व पक्ष्यांना उच्च वाणीने म्हणाला, “या, परमेश्वराच्या महान मेजवानीसाठी एकत्र व्हा! 18 या आणि राजांचे, कप्तानांचे व मोठमोठ्या सेनाधिकार्यांचे मांस खा! घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे, सर्व लहान, थोर, स्वतंत्र, दास यांचे मांस खावयास या.”
19 तेव्हा तो पशू, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये, जो घोड्यावर बसला होता त्याच्याविरुद्ध आणि त्याच्या सैन्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी एकत्र होत असलेले मी पाहिले. 20 त्या पशूला आणि त्याच्याबरोबर त्या खोट्या भविष्यवाद्याला कैद करण्यात आले. हा खोटा संदेष्टे, पशूच्या वतीने आपल्या चमत्कारांनी ज्यांनी त्या पशूची खूण धारण केली होती आणि जे त्याच्या मूर्तीची उपासना करीत असत, त्यांना फसविले होते. त्या दोघांनाही गंधकाने सतत जळत राहणार्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले. 21 जो घोड्यावर बसलेला स्वार होता त्याच्या मुखातून बाहेर येणार्या तलवारीने बाकी राहिलेले मारले गेले आणि सगळ्या पक्षांनी आधाशीपणे त्यांचे मांस खाल्ले.