20
एक हजार वर्षे
1 मग मी एक देवदूत स्वर्गातून खाली उतरतांना पाहिला. त्याच्याजवळ अथांग कूपाची किल्ली होती. त्याच्या हातात एक मोठा साखळदंड होता. 2 त्याने त्या अजगराला, त्या पुरातन सापाला, जो पिशाच्च किंवा सैतान आहे त्याला धरले आणि एक हजार वर्षांसाठी साखळदंडाने जखडून टाकले, 3 आणि अथांग कूपात टाकले. हा हजार वर्षांचा काळ पूर्ण होईपर्यंत अजगराने इतःपर कोणत्याही राष्ट्राला फसवू नये म्हणून त्याने अथांग कूप बंद केले आणि त्याला कुलूप लावून शिक्कामोर्तब केले. त्यानंतर त्याला थोड्या काळासाठी मोकळे सोडण्यात येईल.
4 नंतर ज्यांना न्याय करण्याचे अधिकार देण्यात आले होते त्यांना मी राजासनावर बसलेले पाहिले. आणि येशूंच्या साक्षीमुळे व परमेश्वराच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद करण्यात आला त्यांचे आत्मे पहिले आणि त्यांनी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते किंवा आपल्या कपाळावर व हातावर त्याची खूणही घेतली नव्हती. ते पुन्हा जिवंत झाले होते व त्यांनी ख्रिस्तासह एक हजार वर्षे राज्य केले. 5 हे पाहिले पुनरुत्थान होय. इतर मृत लोक हजार वर्षे संपेपर्यंत पुन्हा जिवंत झाले नाहीत 6 पहिल्या पुनरुत्थानात जे वाटेकरी होतात, ते धन्य आणि पवित्र आहेत, कारण दुसर्या मरणाची त्यांच्यावर सत्ता राहणार नाही. ते परमेश्वराचे व ख्रिस्ताचे याजक होऊन ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.
सैतानाचा न्याय
7 हा हजार वर्षांचा काळ संपल्यावर सैतानाला तुरुंगातून सोडण्यात येईल, 8 आणि तो पृथ्वीच्या चार कोपर्यातील गोग व मागोग राष्ट्रांस ठकविण्यास व त्यांना लढाईसाठी एकत्र करण्यास बाहेर जाईल. त्यांची संख्या समुद्र किनार्यावरील वाळूच्या कणांइतकी आहे. 9 त्यांनी पृथ्वीवर सर्वत्र फिरून पवित्र जणांची छावणी व परमेश्वराला प्रिय असलेले नगर वेढले, परंतु स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यांना भस्म केले. 10 मग त्यांचा विश्वासघात करणार्या सैतानाला ज्या सरोवरात तो पशू आणि खोट्या संदेष्ट्यांना आधी टाकले आहे, त्या अग्नीच्या व जळत्या गंधकाच्या सरोवरात पुन्हा टाकण्यात येईल. तिथे त्यांना रात्रंदिवस, युगानुयुग यातना भोगाव्या लागतील.
शेवटचा न्याय
11 मग एक भव्य शुभ्र राजासन व त्यावर बसलेला एकजण माझ्या दृष्टीस पडला. तेव्हा पृथ्वी व आकाशांनी त्यांच्या समोरून पळ काढला आणि त्यांना कुठेही जागा मिळाली नाही. 12 मग मृत झालेले लहान थोर परमेश्वराच्या आसनासमोर उभे असलेले मी पाहिले आणि पुस्तके उघडण्यात आली. आणखी एक पुस्तक उघडण्यात आले जे जीवनाचे पुस्तक होते. पुस्तकात लिहिल्यानुसार प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला. 13 जे लोक समुद्रात मरण पावले होते, त्यांना समुद्रांनी परत दिले. पृथ्वी व अधोलोक यांनीही आपल्यातील मृतांना बाहेर सोडले. त्या प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला. 14 मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आली. अग्नीचे सरोवर म्हणजेच दुसरे मरण होय. 15 जीवनाच्या पुस्तकात ज्या कोणाचे नाव लिहिलेले सापडले नाही, त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.