अनुवाद
लेखक
मोशेने अनुवाद हे पुस्तक लिहिले, जे यार्देन नदी ओलांडण्याआधीच इस्राएलला त्यांच्या उपदेशांचे संग्रह आहे. “मोशेने बोललेले हे शब्द आहेत” (1:1). कदाचित कोणीतरी (कदाचित, यहोशवा) शेवटचा अध्याय लिहिला असेल. पण हे पुस्तक स्वतःच त्यातील बहुतेक गोष्टी मोशेबद्दल सांगते (1:1, 5; 31:24). अनुवाद या पुस्तकाने मवाबाच्या भागात मोशे व इस्त्राएल यांचे ठिकाण निश्चित केले जिथे यार्देन नदी मृत समुद्रात वाहते (1:5). अनुवाद म्हणजे “दुसरा कायदा.” हा देव आणि इस्त्राएली लोकांमध्ये झालेला करार आहे.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 1446 - 1405.
इस्त्राएलचा प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत प्रवेश होण्यापूर्वी 40 दिवसाच्या कालावधीत हे पुस्तक लिहिण्यात आले.
प्राप्तकर्ता
मिसरातील गुलामगिरीतून आणि सर्व पवित्र शास्त्रीय वाचकांपासून त्यांचे आईवडील 40 वर्षांनी गुलामगिरीतून सुटल्यानंतर प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत प्रवेश करण्यास तयार असलेली इस्त्राएलची एक नवीन पिढी.
हेतू
अनुवाद हे मोशेने इस्राएल राष्ट्राला दिलेले निरोप देण्यासंबंधीचे भाषण आहे. इस्त्राएल प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत प्रवेश करण्यास सज्ज आहे. मिसरातून बाहेर पडण्याच्या चाळीस वर्षानंतर, कनान देश जिंकण्यासाठी यार्देन नदी पार करणार आहे. जरी मोशेचा मृत्यू होणार होता आणि तो देशाबरोबर प्रदेशात जाणार नव्हता. राष्ट्रासाठी देवाच्या आज्ञेचे पालन करण्याकरिता मोशेचे अखेरचे भाषण ही एक आवेशपूर्ण विनंती आहे जेणेकरून त्यांच्या नवीन देशात त्यांच्याबरोबर चांगले होईल (6:1-3, 17-19). भाषण, त्यांचा देव कोण आहे (6:4) आणि त्याने त्यांच्यासाठी काय केले आहे हे लोकांना आठवण करून देते (6:10-12, 20-23). मोशेने लोकांना या आज्ञा पुढील पिढ्यांसाठी पुढे नेण्यास विनंती केली (6:6-9).
विषय
आज्ञापालन
रूपरेषा
1. मिसर देशामधून इस्त्राएल लोकांचा प्रवास — 1:1-3:29
2. परमेश्वराशी इस्त्राएल लोकांचा नातेसंबंध — 4:1-5:33
3. देवाला निष्ठावान राहण्याचे महत्व — 6:1-11:32
4. देवावर प्रेम कसे करायचे आणि त्याच्या आज्ञा कशा पाळायच्या — 12:1-26:19
5. आशीर्वाद आणि शाप — 27:1-30:20
6. मोशेचा मृत्यू — 31:1-34:12
1
होरेब येथे मोशे इस्त्राएल लोकांस परमेश्वराची वचने पुन्हा सांगतो
यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानात अराबामध्ये सुफासमोर, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दि-जाहाब यांच्या दरम्यान मोशे सर्व इस्राएलाशी वचने बोलला ती ही. होरेबपासून कादेश-बर्ण्यापर्यंतचा प्रवास सेईर डोंगरामार्गे अकरा दिवसाचा आहे. हे मिसर सोडल्यानंतर चाळीसाव्या वर्षी घडले, अकराव्या महिन्यातील पहिल्या दिवशी मोशे इस्राएल लोकांशी हे बोलला, परमेश्वराने जे काही सांगायची आज्ञा केली; ते सर्व त्याने सांगितले. अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग यांच्यावर परमेश्वराने हल्ला केल्यानंतरची ही गोष्ट आहे. (सीहोन अमोरी लोकांचा राजा होता. तो हेशबोनमध्ये राहत असे. ओग बाशानाचा राजा होता. तो अष्टारोथ व एद्रई येथे राहणारा होता.) परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशे आता यार्देनच्या पलीकडे पुर्वेस मवाबाच्या देशात नियमांचे विवरण करू लागला. तो म्हणाला, आपला देव परमेश्वर होरेबात आपल्याशी बोलला, या डोंगरात तुम्ही पुष्कळ दिवस राहीला आहात. आता तुम्ही येथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा यार्देनेच्या खोऱ्यात, अराबाच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेबमध्ये समुद्रकिनारी कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा. पाहा हा प्रदेश मी तुम्हास देऊ करत आहे जा आणि त्यावर ताबा मिळवा अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे परमेश्वराने वचन दिले होते.
नायकांची नेमणूक
निर्ग. 18:13-27
तेव्हा मी तुम्हास म्हणालो होतो की “मी एकटा तुमचा सांभाळ करू शकणार नाही. 10 आणि आता तर तुमची संख्या कितीतरी वाढली आहे परमेश्वर देवाच्या कृपेने ती वाढून आकाशातील ताऱ्यांइतकी झाली आहे. 11 तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर, ह्याच्या कृपेने आणखी वाढून आताच्या हजारपट होवो आणि त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद तुम्हास मिळो. 12 परंतु मी एकटा तुमचा भार तसेच तुमची आपापसांतली भांडणे कोठवर सहन करू? 13 म्हणून मी तुम्हास सांगितले, आपापल्या वंशातून अनुभवी, ज्ञानी व समंजस व्यक्तींची निवड करा. मी त्यांना तुमचे प्रमुख म्हणून नेमतो.” 14 त्यावर, “हे चांगलेच झाले असे” तुम्ही मला उत्तर देऊन म्हणालात. 15 म्हणून मी त्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तींना तुमचे प्रमुख म्हणून नेमले. हजारांच्या समूहावर एक अधिकारी, शंभरांवर एक, पन्नासांवर, दहावर तसेच घराण्यावर अशा या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. 16 या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करू नका मग तो वाद दोन भावांमधला असो की एखादा मनुष्य व त्याचा भाऊबंद व उपरी यांच्यातील असो. नीतिने न्याय करा. 17 न्याय करताना कोणालाही कमी लेखू नका. लहान मोठ्यांचे सारखे ऐकून घ्या. कोणाचे तोंड पाहून घाबरू नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे. एखादे प्रकरण तुम्हास विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन. 18 तुमच्या इतर कर्तव्यांबद्दलही मी तेव्हाच तुम्हास आज्ञा केली होती.
कादेश-बर्ण्यास पाठवलेले हेर
गण. 13:1-33
19 मग आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार आपण होरेबहून पुढे अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशाकडे निघालो तेव्हा वाटेत तुम्हास ते विस्तीर्ण आणि भयंकर रान लागले ते सर्व ओलांडून आपण कादेश-बर्ण्याला पोहचलो. 20 मी तुम्हास म्हणालो की पाहा, “अमोऱ्यांच्या पहाडी प्रदेशात तुम्ही पोहोचलात आपला देव परमेश्वर तुम्हास हा प्रदेश देत आहे. 21 पाहा हा प्रदेश तुझा देव परमेश्वर याने पुढे ठेवला आहे. पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार तो हस्तगत करा. कचरू नका व कशाचीही भीती बाळगू नका.” 22 पण तेव्हा तुम्ही सगळे मला म्हणालात, “आधी आपण काही जणांना त्या प्रदेशाच्या पाहाणीसाठी पुढे पाठवू म्हणजे ते त्या देशाची माहिती मिळवून आपल्याला कोणत्या मार्गाने जावे लागेल, कोणकोणती नगरे तेथे लागतील याची खबर आणतील.” 23 मलाही ते पटले म्हणून प्रत्येक घराण्यातून एक अशी बारा माणसे मी निवडली. 24 ते लोक मग निघाले व पहाडी प्रदेशात जाऊन अष्कोल ओढ्यापर्यंत पोहचले व त्यांनी तो देश हेरला. 25 येताना त्यांनी तिकडची काही फळे बरोबर आणली. त्या प्रदेशाची माहिती सांगितली व ते म्हणाले, “आपला देव परमेश्वर देत असलेला देश हा उत्तम आहे.” 26 तथापि तुम्ही तेथे हल्ला करण्याचे नाकारले आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरूद्ध बंड केले. 27 तुम्ही आपापल्या तंबूत जाऊन कुरकुर करत म्हणालात परमेश्वर आमचा द्वेष करतो अमोऱ्यांच्या हातून आमचा नाश व्हावा म्हणूनच आम्हास त्याने मिसर देशातून बाहेर काढले आहे. 28 आता आम्ही कोठे जाणार? आमच्या या भावांच्या बातम्यांमुळे घाबरून आमच्या हृदयाचे पाणीपाणी झाले आहे. त्यांच्यानुसार हे लोक धिप्पाड व आमच्यापेक्षा उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांची तटबंदी आकाशाला भिडली आहे. आणि तेथे अनाकी वंशाचे महाकाय आहेत. 29 तेव्हा मी तुम्हास म्हणालो, “भिऊ नका, त्या लोकांस घाबरू नका. 30 स्वत: परमेश्वर देव तुमच्यापुढे जात आहे. मिसर देशात तुमच्यासमोर त्याने जे केले तेच तो येथेही करील, तो तुमच्यासाठी लढेल; 31 तसेच रानातल्या वाटचालीतही तुम्ही पाहीले, त्यामध्ये तुमचा देव परमेश्वर तुमच्यापुढे होता. मनुष्य आपल्या मुलाला जपून नेतो तसे त्याने तुम्हास येथपर्यंत सांभाळून आणले.” 32 तरीही तुम्ही आपल्या परमेश्वर देवावर विश्वास ठेवला नाही. 33 परमेश्वर प्रवासात तुमच्यासाठी मुक्कामाचे ठिकाण शोधायला तसेच रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन तुम्हास मार्गदर्शन करायला तुमच्यापुढे चालत असे.
इस्त्राएल लोकांनी परमेश्वराने केलेली शिक्षा
गण. 14:20-45
34 परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले व तो संतापला शपथपूर्वक तो म्हणाला, 35 “तुमच्या पूर्वजांना शपथ वाहून देवू केलेला हा उत्तम प्रदेश या दुष्ट पिढीतील एकाच्याही दृष्टीस पडणार नाही, 36 यफुन्नेचा मुलगा कालेब मात्र तो पाहील त्याचे पाय या भूमीला लागले आहेत. त्यास व त्याच्या वंशजांना मी ही भूमी देईल. कारण तो परमेश्वराचा खरा अनुयायी आहे.” 37 तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावरही कोप झाला. तो म्हणाला, मोशे, “तूही या प्रदेशात प्रवेश करणार नाहीस. 38 पण तुझ्या सेवेस हजर राहणारा, नूनाचा मुलगा यहोशवा तेथे जाईल त्यास तू प्रोत्साहन दे, कारण तो इस्राएलांना देश वतन म्हणून मिळवून देईल. 39 परमेश्वर पुढे आपल्याला म्हणाला, शिवाय आपले शत्रू आपल्या मुलाबाळांना पळवतील असे तुम्ही म्हणालात ती आज जी तुमची मुले बरे किंवा वाईट जाणत नाहीत ती मात्र या देशात जातील आणि त्यांना मी तो देश देईन व ते देश ते हस्तगत करतील. 40 पण तुम्ही परत फिरून तांबड्या समुद्राच्या वाटेने रानाकडे कूच करा.”
हर्मा येथे इस्त्राएल लोकांचा पराभव
41 मग तुम्ही मला असे उत्तर दिले की “आमच्या हातून परमेश्वराविरुध्द पाप घडले आहे आपल्या परमेश्वर देवाच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढू.” मग प्रत्येक मनुष्याने आपली शस्त्रास्त्रे घेतली. आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशावर चढावयला तयार झाला. 42 परमेश्वर मला म्हणाला, “त्यांना तेथे सांग युद्ध करू नका. कारण मी त्यांच्या बरोबर नाही. शत्रू त्यांना पराभूत करेल.” 43 त्याप्रमाणे तुम्हास मी सांगितले. पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळली नाही. आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढाई करून गेलात. 44 तेव्हा तेथील अमोरी तुमच्याशी सामना करायला सामोरे आले. आणि चवताळलेल्या मधमाश्यांप्रमाणे त्यांनी सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हास पिटाळून लावले. 45 मग तुम्ही परत येऊन परमेश्वराकडे रडू लागला. पण त्याने तुमचे काहीही ऐकले नाही. 46 तेव्हा तुम्ही कादेश येथे बरेच दिवस राहिला ते तुम्हास माहितच आहे.