३६
१ मनश्शे योसेफचा मुलगा होता. माखिर मनश्शेचा मुलगा होता. गिलाद माखिरचा मुलगा होता. गिलादच्या कुटुंबातील प्रमुख लोक मोशेशी व इस्राएलच्या कुटुंबातील प्रमुखांशी बोलायला गेले. २ ते म्हणाले, “परमेश्वराने आम्हाला चिठ्या टाकून आमची जमीन घेण्याची आज्ञा केली आहे. आणि परमेश्वराने सलाफहादची जमीन त्याच्या मुलींना द्यायची आज्ञा केली आहे. सलाफहाद आमचा भाऊ होता. ३ कदाचित दुसऱ्या कुटुंबातील एखादा माणूस सलाफहादच्या एका मुलीशी लग्न करील तर ती जमीन आमच्या कुटुंबातून जाईल. ती जमीन त्या दुसऱ्या कुटुंबाकडे जाईल का? चिठ्या टाकून मिळालेली आमची जमीन आम्हाला दुरावणार का? ४ लोक त्यांची जमीन विकतील सुद्धा. पण पन्नासव्या वर्षात सर्व जमीन ज्या कुटुंबाची होती त्या कुटुंबाला परत केली जाते त्यावेळी सलाफहादची जमीन कोणाला मिळेल? ती जमीन आमच्या कुटुंबाकडून कायमचीच जाईल का?” ५ मोशेने इस्राएल लोकांना ही आज्ञा केली: ही परमेश्वराची आज्ञा होती, “योसेफच्या कुटुंबातील ह्या लोकांचे म्हणणे बरोबर आहे. ६ सलाफहादच्या मुलींसाठी परमेश्वराची ही आज्ञा आहे: “जर तुम्हाला कोणशी लग्न करायचे असेल तर तुम्ही तुमच्या कुळातील कोणाशी तरी लग्न करा. ७ यामुळे इस्राएल लोकांमध्ये जमीन एका कुळाकडून दुसऱ्या कुळाकडे जाणार नाही. आणि प्रत्येक इस्राएली माणसाला त्याच्या पूर्वजांकडून मिळालेली जमीन ठेवता येईल. ८ आणि जर एखाद्या स्त्रीला तिच्या वडिलांकडून जमीन मिळाली तर तिने तिच्या कुळातील एखाद्याशीच लग्न केले पाहिजे. यामुळे प्रत्येकाला पूर्वजांकडून मिळालेली जमीन ठेवता येईल. ९ तेव्हा इस्राएल लोकांमध्ये जमीन एक कुळाकडून दुसऱ्या कुळाकडे जाऊ शकणार नाही. प्रत्येक इस्राएली माणूस त्याच्या पूर्वजांकडून मिळालेली जमीन जवळ बाळगू शकेल.” १० सलाफहादच्या मुलींनी परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञांचे पालन केले. ११ म्हणून सलाफहादच्या महाला, तिरसा, होग्ला, मिल्का व नोआ यांनी त्यांच्या चुलत भावांशी लग्न केले. १२ त्यांचे नवरे मनश्शेच्या कुळातील होते. म्हणून त्याची जमीन त्यांच्या वडिलांच्या कुळाकडेच राहिली. १३ परमेश्वराने यार्देन नदीजवळ मवाबमधील पलीकडे मोशेला दिलेल्या या आज्ञा आहेत.