25
अम्मोन्यांविषयी भविष्य
1 नंतर परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले की,
2 “मानवाच्या मुला, तू आपले मुख अम्मोन्यांच्या लोकांविरूद्ध लाव आणि त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग.
3 अम्मोनाच्या लोकांस सांग, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर असे म्हणतो की, माझे पवित्रस्थान बाटविण्यात आले तेव्हा त्याविरूद्ध होता आणि इस्राएल देश उद्ध्वस्त करण्यात आला, तेव्हा तिच्याविरूद्ध होता आणि यहूदाचे घराणे जेव्हा बंदिवासात गेले तेव्हा त्यांच्याविरुद्ध तू, अहा! म्हणालास,
4 म्हणून पाहा! मी तुला पूर्वेकडच्या लोकांस त्यांची मालमत्ता देईन. ते तुमच्याविरुध्द छावणी देतील आणि आपले तंबू तुमच्यात देतील. ते तुझे फळ खातील व ते तुझे दूध पितील.
5 आणि मी राब्बाचे उंटासाठी कुरण करीन व अम्मोन लोकांच्या कळपासाठी शेत करीन. मग तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे.
6 कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, की तू इस्राएल देशाविरूद्ध टाळ्या वाजविल्या व तुझे पाय आपटले व आपल्या मनापासून तुच्छतेने आनंद केलास.
7 म्हणून पाहा! मी आपल्या हाताने तुला तडाखा देईन आणि तुला राष्ट्रांस लूट असे देईन. मी तुला दुसऱ्या लोकांपासून कापून दूर करीन आणि तुझा नाश करीन. मी तुला देशामधून नाहीसे करीन आणि तेव्हा तुला समजेल मी परमेश्वर आहे.
मवाबाविषयी भविष्य
8 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण मवाब व सेईर म्हणतात ‘पाहा! यहूदाचे घराणे सर्व इतर राष्ट्रांसारखेच आहे.
9 यास्तव पाहा! मी मवाबाचा उतार उघडा करीन, त्याच्या सीमेवरील बेथ-यशिमोथ, बाल-मौन, किर्याथाईम ही वैभवी नगरे सुरुवात होतात,
10 पूर्वेकडचे लोक जे कोणी अम्मोनी लोकांविरूद्ध आहेत. मी त्यांना त्यांचा ताबा देईन याकरिता की, अम्मोनी लोकांची आठवण राष्ट्रांमध्ये कोणी काढणार नाही.
11 म्हणून मी मवाबाविरूद्ध न्याय तडीस नेईन आणि त्यांना समजेल की मीच परमेश्वर आहे.
अदोमाविषयी भविष्य
12 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, अदोमाने यहूदाच्या घराण्याविरूद्ध सूड घेतला आहे आणि असे करून त्यांने अपराध केला आहे.
13 म्हणून प्रभू परमेश्वर, म्हणतो, “मी अदोमाला आपल्या हाताने तडाखा देईन आणि प्रत्येक पुरुषाचा व तेथील प्राण्यांचा नाश करीन. तेमानापासून ददानापर्यंत मी त्यांचा विध्वंस करीन, ते ठिकाण सोडून देईन. ते तलवारीने पडतील.
14 याप्रकारे मी आपले लोक इस्राएल यांच्या हातून अदोमावर सूड घेईन आणि माझ्या क्रोधाप्रमाणे आणि माझ्या त्वेषाप्रमाणे ते अदोमाचे करतील. मग त्यांना माझा सूड कळेल. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
पलिष्ट्यांविषयी भविष्य
15 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण आपल्या मनात फार जुने शत्रुत्व आणि तिरस्कार बाळगून पलिष्ट्यांनी यहूदावर सूड घेतला आहे आणि तिचा नाश केला आहे.
16 म्हणून, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी पलिष्ट्यांविरूद्ध आपला हात उगारीन आणि करेथी लोकांस कापून टाकीन आणि जे कोणी समुद्रकिनाऱ्यावरील अवशिष्ट राहिलेल्यांचा नाश करीन.
17 कारण संतापाने मी त्यांच्याविरुद्ध भयंकर सूड घेऊन त्यांना मी शिक्षा करीन. मी त्यांच्यावर सूड उगवीन तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”