26
सोरेविषयी भविष्य
1 आणि असे झाले की, बाबेलातील बंदिवासाच्या अकराव्या वर्षी, महिन्याच्या पहिल्याच दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
2 “मानवाच्या मुला, कारण सोर यरूशलेमेविरूद्ध म्हणत आहे, अहा! लोकांचे प्रवेशद्वार तुटले आहेत! ती माझ्याकडे वळली आहे; जशी ती उजाड झाली तशी मी ओतप्रोत भरेल.”
3 म्हणून, प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा सोर, मी तुझ्याविरूद्ध आहे आणि जसा समुद्र आपल्या लाटा उंचावतो तसे मी तुजविरूद्ध पुष्कळ राष्ट्रांना उठविन.”
4 ते सोरेच्या तटाचा नाश करतील आणि तिचे बुरुज पाडून टाकतील. मी तिची धूळ झाडून दूर करीन आणि तिला उघडा खडक करीन.
5 ती समुद्रामध्ये जाळीसाठी वाळवण्याची जागा होईल. असे प्रभू परमेश्वर म्हणतो, आणि ती राष्ट्रासाठी लूट अशी होईल.
6 तिच्या कन्या ज्या कोणी शेतात आहेत त्या तलवारीने वधल्या जातील आणि त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
7 कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी उत्तरेकडून बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर, राजांचा राजा याला मी घोडे व रथ, आणि घोडदळ! पुष्कळ लोकांची फौज घेऊन सोराविरूद्ध आणत आहे.
8 तो तुझ्या कन्यांना शेतात तलवारीने मारील आणि तुझ्याविरूद्ध उतरती वेढ्याची भिंत बांधील आणि तुझ्याविरूद्ध ढाल उभारील.
9 तो तुझ्या तटाला पाडण्यासाठी आपला मोठा ओंडका ठेवील आणि आपल्या हत्यारांनी तुझे बुरुज पाडून टाकील.
10 घोड्यांच्या जमावांच्या धुळीने तो तुला झाकून टाकील. जेव्हा तो हल्ला करून तटबंदीची नगरे पाडून जसे आत शिरतात तसे तो तुझ्या वेशीतून आत प्रवेश करेल, तेव्हा घोड्यांच्या आवाजाने आणि रथांच्या चाकांच्या खडखडाटाने तुझे तट थरथर कापतील.
11 तो आपल्या घोड्यांच्या टापांनी तुझे सर्व रस्ते तुडवितील. तो तुझ्या लोकांची तलवारीने कत्तल करील आणि तुझे भक्कम स्तंभ जमीनीवर पडतील.
12 याप्रकारे ते तुझी शक्ती आणि व्यापारी माल लुटतील! ते तुझे तट आणि तुझी श्रीमंत घरे पाडून टाकतील तुझे दगड व लाकूड आणि तुझी माती ते पाण्यामध्ये घालतील.
13 कारण मी तुझ्या गीतांचा आवाज बंद पाडीन आणि तुझ्या तंतुवाद्यांचा आवाज पुन्हा कधीही ऐकू येणार नाही.
14 कारण मी तुला उघडा खडक करीन, तू जाळी कोरडी करण्यासाठीची जागा होशील, तुझी पुन्हा उभारणी होणार नाही. कारण मी, परमेश्वराने असे म्हटले आहे, प्रभू परमेश्वर असे म्हणतो.
15 प्रभू परमेश्वर सोरला म्हणतो, तुझ्या अधःपतनाच्या आवाजाने आणि जेव्हा तुझ्यामध्ये भयंकर कत्तल झाली त्यामध्ये जखमीच्या कण्हण्याने द्वीपांचा थरकाप होणार नाही का?
16 कारण समुद्रातले सर्व प्रमुख आपल्या सिंहासनावरून खाली उतरतील आणि आपले झगे बाजूला काढून ठेवतील आणि आपले रंगीबेरंगी वस्त्रे काढून टाकतील. ते स्वतःला भीतीच्या वस्त्राने आच्छादतील आणि भीतीने जमिनीवर बसतील व वारंवार कांपतील आणि तुझ्याविषयी भयचकीत होतील.
17 ते तुझ्यासाठी ओरडून विलाप करून तुला म्हणतील, “अगे, जे कोणी खलाशी तुझ्यात वस्ती करून होते त्यांचा नाश झाला आहे. जी तू बलवान प्रसिद्ध नगरी होती. ती आता समुद्रात आहे. जी तू तेथे राहणाऱ्या प्रत्येकजणास दहशत घालीत होतीस ती तू कशी नष्ट झाली आहेस?
18 आता, तुझ्या पडण्याच्या दिवशी, समुद्रकिनारीचा देशांचा भीतीने थरकाप उडेल. समुद्र किनाऱ्यावरील देश भयभीत झाले आहेत, कारण तू पाण्यात गेली आहेस.”
19 कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जी नगरे वसली नाहीत त्यासारखे जेव्हा मी तुला ओसाड नगर करीन, जेव्हा मी तुझ्यावर खोल समुद्र आणीन आणि तेव्हा प्रचंड जले तुला झाकतील.
20 मग मी तुला ते जे कोणी दुसरे खाचेत खाली प्राचीन काळच्या लोकांकडे गेले आहेत त्यांच्यासारखे प्राचीन काळापासून ओसाड असलेल्या स्थानात तुला पृथ्वीच्या अधोभागी तुला रहावयास लावीन म्हणजे तू पुन्हा वसणार नाहीस.
21 मी तुझ्यावर विपत्ती आणिन आणि तू अस्तित्वात असणार नाहीस. मग तुला शोधतील, पण तू त्यांना पुन्हा कधीही सापडणार नाहीस” असे प्रभू परमेश्वर, म्हणतो.