24
दुष्टाईकडे देव दुर्लक्ष करतो ही ईयोबाची तक्रार
“त्या सर्वशक्तिमानाने न्यायवेळ का नेमून ठेवली नाही?
त्यास ओळखणाऱ्यांना त्या न्याय दिवसाची का प्रतिती येत नाही?
आणि काही जण हद्द दर्शविणाऱ्या खुणा सरकवतात.
लोक पशूंचे कळप चोरुन स्वच:च्या रानात चरायला नेतात.
ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात.
ते विधवेचा बैल गहाण म्हणून ठेवतात.
ते गरजंवताना त्यांच्या मार्गापासून बहकवतात.
सगळ्या पृथ्वीवरील गरीबांना या दुष्टांपासून लपून रहावे लागते.
गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते काळजीपूर्वक अन्नाचा शोध घेतात.
त्यांच्या मुलाबाळांना जंगल अन्न पुरवते.
गरीब लोक रात्रीपर्यंत इतरांच्या शेतात कापणी करतात,
आणि ते दुष्टांच्या पिकातील द्राक्षे वेचतात.
त्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपावे लागते.
थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ पांघरुण नसते.
ते डोंगरावरील पावसाने भिजतात,
आश्रय नसल्याकारणाने ते खडकांना कवटाळून बसतात.
दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आई जवळून घेतात.
ते गरीबाच्या त्याने काढलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून त्यांची मुले ठेवून घेतात.
10 ते कपडे नसल्यामुळे उघडेच असतात,
ते दुसऱ्यांच्या धान्यांच्या पेंढ्या वाहतात पण स्वत: मात्र उपाशीच राहतात.
11 ते आवाराच्या आत तेल काढतात,
ते दुष्टांच्या द्राक्षकुंडात द्राक्ष तुडवतात तरी ते तान्हाले राहतात.
12 शहरात मरणास टेकलेल्या मनुष्यांचे दु:खद रडणे ऐकू येते,
घायाळाचा आत्मा आरोळी मारतो,
परंतु देव त्यांच्या प्रारर्थनेकडे लक्ष देत नाही.
13 काही लोक प्रकाशा विरूद्ध बंड करतात.
देवाला काय हवे आहे हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा नसते.
देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे त्यांना आवडत नाही.
14 खुनी सकाळी लवकर उठतो
आणि गरीब व असहाय्य लोकांस ठार मारतो
तो रात्रीच्या वेळी चोरासारखा असतो.
15 ज्या मनुष्यास व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो.
तो म्हणतो, ‘मला कोणीही बघणार नाही’ पण तरीही तो त्याचा चेहरा झाकतो.
16 रात्रीच्या वेळी अंधार असतो तेव्हा दुष्ट लोक दुसऱ्यांची घरे फोडतात.
पण दिवसा ते स्वत:ला त्यांच्या घरांत कोंडून घेतात. ते प्रकाशाला टाळतात.
17 त्या दुष्टांना काळीकुटृ रात्र सकाळसारखी वाटते.
त्या भयंकर काळोखाची भयानकता त्यांना चांगलीच माहीत असते.
18 पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात,
त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो,
त्यांच्या शेतात काम करण्यास कोणीही जात नाहीत.
19 हिवाळ्यातल्या बर्फापासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते.
त्याप्रमाणे त्या पापी लोकांस थडग्यात नेले जाते.
20 ज्या उदराने त्यास जन्म दिला ती विसरून जाईल,
त्याची आठवण राहणार नाही,
त्याप्रमाणे दुष्टपणा झाडासारखा मोडून पडेल.
21 दुष्ट माणसे वांझ बायकांना त्रास देतात ज्यांना मुले झालेली नाहीत,
ते विधवांसाठी काही चांगले करीत नाहीत.
22 तरी देव आपल्या सामर्थ्याने बलवानास राखतो,
ज्याला जगण्याचा भरवसा नाही तो उठतो,
23 देव दुष्टांना आपण सुरक्षित आहेत असा विचार करण्यास भाग पाडतो
आणि त्याविषयी ते आनंदी होतात.
24 ते उंचावले जातात परंतू थोड्या काळापुरते नंतर ते जातात.
खरोखर, ते खचून जातात, ते इतर सर्वांप्रमाणे काढून टाकले जातात.
आणि ते कणसाच्या शेड्यांप्रमाणे कापून टाकले जातात.
25 या गोष्टी खऱ्या नाहीत असे कोण म्हणतो, मी खोटे बोललो हे कोण सिध्द करेल?
माझे बोलने निरर्थक आहे हे कोण दाखवून देईल?”