34
सिद्कीयाला यिर्मयाचा इशारा
परमेश्वरापासून यिर्मयाकडे वचन आले. नबुखद्नेस्सर बाबेलाचा राजा व त्याचे सर्व सैन्य व त्याच्या सत्तेखाली असलेली पृथ्वीवरील सर्व राज्ये व सर्व लोक यरूशलेमेशी व त्याच्या सर्व नगरांशी लढत होते तेव्हा हे वचन आले. ते या प्रमाणे, परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, “जा आणि यहूदाचा राजा सिद्कीया याच्याशी बोलून सांग, पाहा हे नगर मी बाबेलाच्या राजाच्या हाती देईन. तो ते जाळून टाकील. तू त्याच्या हातून सुटणार नाहीस, कारण खात्रीने पकडला जाऊन आणि त्याच्या हाती दिला जाशील. जेव्हा तू बाबेलास जाशील, तू आपल्या डोळ्यांनी बाबेलाच्या राजाला प्रत्यक्ष पाहशील आणि तुम्ही समोरासमोर येऊन एकमेकांशी बोलाल.
सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याबद्दल असे म्हणतो की, तुला तलवारीने मृत्यू येणार नाही. तू शांतीने मरशील. तुझ्या पूर्वीचे राजे तुझे पूर्वज यांच्याकरिता धूप वगैरे जाळीत तसे तुझ्याकरता जाळतील, व हाय रे, माझ्या स्वामी असे बोलून तुझ्याकरता शोक करतील; आता मी बोललो आहे. हे परमेश्वराचे वचन आहे.”
म्हणून यिर्मया संदेष्ट्याने परमेश्वराची ही सर्व वचने यरूशलेमेमध्ये सिद्कीया राजाला सांगितली. त्यावेळी बाबेलाच्या राजाचे सैन्य यरूशलेमेविरूद्ध लढत आणि यहूदातील उरलेल्या सर्व नगराविरूद्ध म्हणजे लाखीश व अजेकाशी लढत होते. यहूदामध्ये तटबंदी असलेली ही नगरे राहिली होती.
इब्री दासांसंबंधीची करार मोडला
सिद्कीया राजाने यरूशलेमेतील सर्व लोकांबरोबर स्वतंत्र करण्याचा करार प्रस्थापित करून घोषित केल्यानंतर यिर्मयाला जे परमेश्वराचे वचन आले. तो करार म्हणजे प्रत्येकाने आपल्या इब्री दासास, पुरुष व स्त्रिला मोकळे करावे. कोणीही आपल्या इब्री बंधूकडून दास्य करून घेऊ नये.
10 म्हणून सर्व नेत्यांनी व लोकांनी या कराराचे पालन करण्यास मान्यता दिली. प्रत्येकजण आपल्याकडील स्त्री वा पुरुष गुलामांना ह्यापुढे गुलाम म्हणून न ठेवता मुक्त करावे. त्यांनी ऐकले आणि त्यांना पाठवून दिले. 11 पण त्यानंतर त्यांनी आपले मन बदलले. त्यांनी त्यांना गुलाम होण्यास भाग पाडले.
12 मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले, 13 परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून दास्याच्या घरातून बाहेर आणले तेव्हा मी त्यांच्याशी करार केला. तो म्हणजे, 14 जो तुझा इब्री भाऊ तुला विकला होता त्यास तुम्ही प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी मुक्त करून सोडा, त्याने सहा वर्षे तुझी सेवा केली तेव्हा तू आपल्यापासून सुटका दे; परंतु तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही व लक्ष दिले नाही.
15 आता तुम्ही स्वतः पश्चाताप केला होता आणि माझ्या दृष्टीने जे योग्य आहे ते करू लागला होता. तुम्ही प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याच्या मनुष्यास स्वातंत्र जाहीर केले. आणि ज्या घराला माझे नाव ठेवले आहे त्यामध्ये तुम्ही माझ्यासमोर करार केला होता. 16 पण नंतर तुम्ही बदलला आणि माझे नाव अपवित्र केले; ज्यांना तुम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे कोठेही जाण्यास पाठवले होते. त्यांना तुम्ही प्रत्येक मनुष्याने आपल्या मुक्त केलेल्या दासांना स्त्रिया व पुरुष यांना परत आणले. त्यांना बळजबरीने पुन्हा तुमचे दास केलेत. 17 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही प्रत्येकाने आपल्या भावास व सहकारी इस्राएलास स्वातंत्र्य जाहीर करायचे होते. तुम्ही माझे ऐकले नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हाविरुध्द तलवारीला, मरीला आणि दुष्काळाला स्वातंत्र्य जाहीर करतो, कारण पृथ्वीवरील प्रत्येक राज्याच्या दृष्टीने मी तुम्हास असे काही करीन की, त्याबद्दल ऐकून भीतीने थरथर कापाल. 18 मग ज्या लोकांनी माझा कराराचा भंग केला आहे, ज्यांनी माझ्यासमोर केलेल्या कराराचे वचन पाळले नाही. त्यांनी वासराचे दोन तुकडे केले व ते त्यामधून चालत गेले. 19 जे यहूदा आणि यरूशलेमेचे सरदार, षंढ, याजक व देशातले सर्व लोक जे वासराच्या दोन भागांमधून चालत गेले. 20 मी त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातात देईल आणि त्यांना त्यांचा जीव घेऊ पाहणाऱ्याच्या हाती देईल. त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व पृथ्वीवरील पशूंना भक्ष्य होतील. 21 म्हणून मी यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार ह्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती आणि जे त्यांचा जीव घेऊ पाहणाऱ्यास हाती व बाबेलाच्या राजाचे जे सैन्य तुम्हापासून निघून गेले आहे त्यांच्या हाती देईन. 22 परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आज्ञा देत आहे आणि ते नगराकडे परत येतील असे करीन, तेव्हा ते त्याविरूद्ध लढतील व ते घेतील व ते जाळून टाकतील; कारण मी यहूदाची नगरे रहिवासीहीन ओसाड करीन.”