35
रेखाब्यांचे आज्ञापालन
यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या दिवसात यिर्मयाला परमेश्वराकडून वचन आले ते हे आहे. ते म्हणाले, “रेखाब्याच्या घराण्याकडे जा आणि त्यांच्याशी बोल. मग त्यांना माझ्या घरातील एका खोलीत आण आणि त्यांना पिण्यास मद्य दे.”
म्हणून मी हबसिन्याचा मुलगा यिर्मया याचा मुलगा याजना आणि त्याच्या भावांना व सर्व मुलांना आणि रेखाब्याच्या सर्व घराण्याला घेतले. मी त्यांना परमेश्वराच्या मंदिरात, देवाचा मनुष्य इग्दल्याचा मुलगा हानान याच्या खोलीत आणले. या खोल्या शल्लुमाचा मुलगा मासेया द्वारपाल, याच्या बाजूच्या खोलीच्या वर असलेल्या नेत्यांची होती.
नंतर मी रेखाब्यांसमोर द्राक्षरसाने भरलेले कटोरे व पेले ठेवले आणि त्यांना म्हणालो, “थोडा द्राक्षरस प्या.” पण ते म्हणाले, “आम्ही द्राक्षरस पिणार नाही, कारण आमचे पूर्वज, रेखाब यांचा मुलगा योनादाब, यांने आम्हास आज्ञा दिली, ‘तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी सर्वकाळपर्यंत कोणताही द्राक्षरस पिऊ नये.’ शिवाय कोणतेही घरे बांधू नका, कोणतेही बी पेरु नका, किंवा कोणतेही द्राक्षमळे लावू नका. हे तुमच्यासाठी नाहीत. तर तुम्ही आपल्या सर्व दिवसात तंबूत राहिले पाहिजे, याकरीता ज्या देशात तुम्ही परदेशी आहात त्यामध्ये दीर्घकाळ जगावे.
आमचा पूर्वज रेखाब याचा मुलगा योनादाब याची वाणी आम्ही पाळत आलो आहोत, त्यामध्ये आम्ही आमच्या स्त्रिया, आमची मुले, आणि आमच्या मुलींनी आपल्या सर्व दिवसात द्राक्षरस पिऊ नये अशी आज्ञा त्याने आम्हास दिली आहे. आणि आम्ही त्यामध्ये राहण्यासाठी कधीही घरे बांधीत नाही आणि तेथे आमच्या स्वत:च्या मालकीची शेते व द्राक्षमळे नाहीत. 10 आम्ही तंबूत राहतो आणि ऐकतो व आमचा पूर्वज योनादाब यांने आम्हास सर्व आज्ञापिल्याप्रमाणे वागत आलो. 11 पण जेव्हा बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने देशावर हल्ला केल्यावर, आम्ही म्हणालो, खास्द्यांच्या व अराम्यांच्या सैन्यापासून आपण यरूशलेमेला निसटून जाऊ. म्हणून आम्ही यरूशलेमेमध्ये राहत आहोत.”
12 मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले, 13 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, “जा आणि यहूदातील मनुष्यांना व यरूशलेमेच्या रहीवाश्यांना सांग, तुम्ही माझी वचने ऐकूण आणि ती शासन स्विकारणार नाही का?” असे परमेश्वर म्हणतो. 14 रेखाबाचा मुलगा योनादाब याने आपल्या मुलांना कोणताही द्राक्षरस पिऊ नका अशी आज्ञा दिली त्यांनी त्याचा शब्द आजपर्यंत पाळला. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या आज्ञेचे पालन केले. पण मी स्वत: तुम्हास पुन्हा पुन्हा सांगत आलो, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही.
15 इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सर्व सेवक, संदेष्टे पाठविले. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यास पाठविले, प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून वळा आणि चांगली कृत्ये करा. दुसऱ्या देवांना अनुसरू नका आणि त्यांची पूजा करु नका. त्याऐवजी, तुमच्या पूर्वजांना व तुम्हास जो देश दिला आहे त्यामध्ये परत माघारी या. पण या लोकांनी माझे ऐकले नाही. 16 कारण रेखाबाचा मुलगा योनादाबाच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी त्यांना दिलेल्या आज्ञा पाळल्या, पण या लोकांनी माझे ऐकण्याचे नाकारले.
17 म्हणून परमेश्वर, सैन्यांचा देव आणि इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “पाहा, जे सर्व अरिष्ट मी त्यांच्याविरुद्ध आणणार म्हणून मी म्हणालो आहे, ते सर्व मी यहूदावर आणि यरूशलेमेच्या राहणाऱ्यांवर आणीन, कारण मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी ऐकण्याचे नाकारले. मी त्यांना हाका मारल्या पण त्यांनी उत्तर दिले नाही.”
18 यिर्मया रेखाबाच्या कुटुंबियांना म्हणाला, “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव, असे म्हणतो, ‘तुम्ही आपला पूर्वज योनादाब ह्यांच्या आज्ञा ऐकल्या आणि त्या सर्व पाळल्या. जे त्याने करण्यास आज्ञापिले त्याप्रमाणे तुम्ही केले आहे. 19 म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, रेखाबाचा मुलगा योनादाब याच्या वंशजांपैकी कोणीतरी एक नेहमीच माझ्या सेवेत राहील.”