26
इय्योब 
  1 नंतर इय्योबाने उत्तर देऊन म्हटले:   
 2 “तुम्ही दुर्बळाचे कसे साहाय्य केले!  
एखाद्या शक्ती नसलेल्या हाताला कसे संरक्षण दिले!   
 3 बुद्धिहीनाला तुम्ही काय सल्ला दिला!  
आणि कोणते प्रचंड अंतर्विचार तुम्ही सादर केले आहे!   
 4 असे शब्द बोलण्यास तुम्हाला कोणी साहाय्य केले?  
आणि कोणाचा आत्मा तुमच्या मुखाद्वारे बोलला आहे?   
 5 “जे मेलेले आहेत ते मोठ्या यातनांमध्ये आहेत,  
जे जलांमध्ये आणि जलांच्या खाली राहतात ते सुद्धा तसेच आहे.   
 6 मृतांचे जग परमेश्वरापुढे उघडे आहे;  
त्यांच्या दृष्टीपासून नाश*किंवा अबद्दोन लपलेला नाही.   
 7 परमेश्वर उत्तरेकडील नभोमंडळ मोकळ्या अंतरिक्षावर पसरवितात;  
आणि पृथ्वी निराधार टांगली आहे.   
 8 आपल्या घनदाट मेघांमध्ये ते जल कोंडून ठेवतात,  
तरीही त्यांच्या वजनाने आभाळ फाटत नाहीत.   
 9 त्यांनी आपले मेघ पसरवून,  
पौर्णिमेच्या चंद्राचे मुख झाकले आहे.   
 10 त्यांनी जलांवर क्षितिज नेमून ठेवले आहे  
प्रकाश व अंधकारासाठीही सीमा आखून दिल्या आहेत.   
 11 परमेश्वराच्या धमकावण्याने आकाशातील स्तंभ थरथरतात,  
त्यांच्या धाकाने ते भयचकित होतात.   
 12 आपल्या शक्तीने ते सागर घुसळून टाकतात;  
आणि आपल्या बुद्धीच्या बलाने राहाबाचे तुकडे तुकडे करतात.   
 13 केवळ त्यांच्या श्वासाने आकाशाला सौंदर्य लाभते;  
त्यांच्या हाताने वेगाने सळसळणार्या सर्पाला विंधले आहे.   
 14 परमेश्वर करतात त्यातील या तर केवळ किरकोळ गोष्टी आहेत;  
आम्ही मात्र त्यांचा कानोसा घेऊ शकतो!  
त्यांच्या सामर्थ्याचा गडगडाट कोण समजू शकणार?”