20
शरणागर्थीसनं शहर
(गणना 35:9-34)
1 मंग यहोशवा परमेश्वरले बोलना,
2 इस्त्राएल लोकेसले सांग, मी मोशेकडतीन तुमले सांग व्हतं की शरणपुरे ठरावानं;
3 म्हणजे कोणी भुलीचुकीसनं एखादाना जीव लिदा व्हई त्यामा त्याले पयी जाता येई अनी खूनना सुड लेनारापाईन तुमले ती रक्षणस्थान व्हई.
4 असा माणुस एखादा नगरकडे पयी गया म्हणजे त्यानी नगरना वेशीपान उभं राहावानं अनी तठेना वडील मंडयीले आपलं प्रकरनं सांगानं, मंग त्यासनी त्याले आपला नगरमां लिसनं आपलामां राहावाले जागा देवानं.
5 खुनना सुड लेनारानी त्याना पाठलाग करं ते त्या वडील लोकेसनी त्या मनुष्यवध करनाराले त्याना हातमां देवानं नही; कारण त्यानी नकयत आपला शेजाराले मारेल शे; त्यानं त्यानासंगे पुर्वीन वैर नही व्हतं.
6 मंडयीनासमोर त्याना न्याय व्हसं तोपावोत नाहीते त्या येळना मुख्य याजक हयातमां व्हयी तोपावोत त्यानी त्या नगरमां राहावानं; मंग पाहीजे ते ज्या गावमाईन तो पयेल शे तठे त्यानी परत जाईसन आपला घर राहावानं.
7 यानावरतीन त्यासनी नफतालीना डोंगराय परदेशमाधला गालीलमां केदेश, एफ्राइमना डोंगरवटले शखेम, यहुदाना डोंगराय परदेशमाधला किर्याथ-आर्बा ऊर्फ हेब्रोन हया नगर येगळा नेमी ठेयेल व्हतात.
8 यरीहोना पुर्वेले यार्देननातिकडे त्यासनी रऊबेन वंशना विभागमाईन मायवरना जंगलमाधला बेसेर, गाद वंशना विभागमाईन गिलादमाधला रामोथ अनी मनश्शे वंशना विभागमाईन बाशानमाधला गोलान हया नगर ठेवात.
9 बठा इस्त्राएल लोकेसकरता अनी त्यासमां राहानारा परदेशी लोकेसकरता हया नेमेल नगर व्हतात; त्या यानाकरता की एखादानी एखादाले भुलीचुकीतीन मारं अनी तो अस एक नगरमां पयी गया ते मंडयीनामोरे उभं राहीसनं त्याना न्याय व्हावाशिवाय खुनना सुड लेनाराले त्याले जीवे मारता येवाले नही पाहीजे.